पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या;बीड शहरातील खळबळजनक घटना
कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल;८ वर्षांची चिमुकली झाली पोरकी
लोकगर्जनान्यूज
बीड : पत्नीची हत्या करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार ( दि. १२ ) सकाळी शहरातील वृंदावन कॉलनी मध्ये उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने मात्र ८ वर्षांची चिमुकली पोरकी झाली. शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.
भागवत बलभीम वायभट ( वय ३६ वर्ष ), राधा भागवत वायभट ( वय ३० वर्ष ) रा. लिंबागणे ( ता. बीड ) हल्ली मु. वृंदावन कॉलनी, अहमदनगर रोड, बीड असे मयत पती-पत्नीची नावे आहेत. भागवत वायभट हे पत्नी आणि ८ वर्षीय मुलीसह मागील काही वर्षांपासून शहरात भाड्याच्या घरात राहत होते. शनिवारी ( दि. ११ ) रात्री भागवत वायभट यांनी पत्नी राधा यांचा ऊशीच्या सहायाने तोंड दाबून हत्या केली. यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवार ( दि. १२ ) सकाळी मुलगी आईला जागे करत होती त्या उठत नसल्याने तर वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने मुलीने घरमालकांना माहिती दिली. यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.बी. खेडकर, सपोनि विलास मोरे, पोउपनि. आर.डी. पठाडे, पो.ह. फेरोज पठाण, संजय राठोड, अशोक राडकर, सुदर्शन सारणीकर, रविंद्र आघाव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आई-वडीलांच्या रागाची शिक्षा मुलीला मिळाली असून ती पोरकी झाली. तीच्या आक्रोशाने पहाणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले असल्याचे दिसून आले.