पंकजा मुंडेची गाडी आडवण्याचा प्रयत्न; पोलीसांच्या लाठीचार्ज मुळे मराठा आंदोलक आक्रमक
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यात पावनधाम येथे पंकजा मुंडे आल्या असता त्यांना पुन्हा एकदा मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंडेची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला. गाडी अडवण्याचा प्रयत्न होताच मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलक आक्रमक झाले. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाल्याने मुंडे यांनी काढता पाय घेतला.
तालुक्यातील औरंगपूर येथील तुकाराम पावनधाम येथे आज अखंड हरिनाम सप्ताह असल्याने भाजपा नेत्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पंकजा मुंडे या सप्ताह स्थळी येताच मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज करत गर्दीतून मुंडे यांची गाडी बाहेर काढून दिली. अचानक गोंधळ सुरू झाल्याने येथे धावपळ होऊन काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु पंकजा मुंडे यांनी काढता पाय घेतल्याने लोकांच्या प्रकार लक्षात आल्यावर तणाव निवळला. पंकजा मुंडे येणार असल्याने पोलीसांनी सकाळीच काही मराठा तरुणांना ताब्यात घेतले होते त्यामुळे येथे सकाळ पासून वातावरण तणावाचे होते. यापुर्वीही मुंडे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले तर आता घोषणाबाजी करत अडविण्याचा प्रयत्न झाला यामुळे पंकजा मुंडे यांना आतापर्यंत दोनवेळा मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला.