पंकजा मुंडेंची तत्परता! एक ट्विट अन् अंगणवाडीचा प्रश्न सुटला
केज तालुक्यातील कोरेगावच्या नागरिकांनी मानले आभार

लोकगर्जना न्यूज
केज : तालुक्यातील कोरेगाव येथे अंगणवाडीला इमारत नाही त्यामुळे लेकरांना उघड्यावर बसावं लागतं असे. याबाबतीत गावातील एका पालकाने भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना ट्विट करुन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. याची दखल घेऊन ताईंनी फोनाफोनी केली अन् केज पंचायत समितीने कोरेगाव अंगणवाडीसाठी १ लाख ६७ हजार निधी मंजूर केला. बीडिओनी भेट देऊन काम पुर्ण होईपर्यंत अंगणवाडीच्या लेकरासाठी तात्पुरत्या स्वरुपात शेडची व्यवस्था केली. एका ट्विट मुळे प्रश्न सोडविल्याने पंकजा मुंडे यांचे ग्रामस्थांकडून आभार मानले जात आहे.
याबाबतीत समजलेली माहिती अशी की, कोरेगाव ( ता. केज ) येथे अंगणवाडी आहे परंतु इमारत नाही. लहान बालकांना पाऊस,ऊन,थंडी अशा तिन्ही ऋतूत उघड्यावर बसावं लागतं असे. या बालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन जागरुक गावकरी उमाकांत तांदळे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना ट्विट करुन आमच्या गावात अंगणवाडीची इमारत नाही. त्यामुळे बालकांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागते, तुम्ही जर मदत केली तर ही अडचण दूर होईल असे म्हटले. या ट्विटची दखल घेऊन पंकजाताई यांनी रिप्लाय देत मी फंड मंजूर करून देते. थोडं वेळ लागेल तोपर्यंत शाळा खोली अथवा इतर काही पर्यायी व्यवस्था करा. तसेच बीडीओ गावाला भेट देतील असे सांगितले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून या अडचणी सांगितल्या याची दखल घेत केज पंचायत समितीने तातडीने लोकल सेस फंडातून १ लाख ६७ हजारांचा निधी मंजूर केला. मंजुरी पत्र ग्रामपंचायतीकडे सुपुर्द केला. बीडीओ यांनी सकाळी गावाला भेट देऊन पाहणी केली. अंगणवाडी खोलीचे बांधकाम होईपर्यंत लेकरासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली.