पंकजा मुंडेंचा ऐतिहासिक निर्णय: २४ वर्षीय तरूणाच्या खांद्यावर धारुर कृषी उ.बा.स. सभापतीपदाची जबाबदारी
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती यांची सोमवारी ( दि. २ ) निवड झाली. यामध्ये पंकजा मुंडे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत मंगेश तोंडे या २४ वर्षीय तरुणाची सभापतीपदी निवड करुन आश्चर्याचा धक्का दिला. बाजार समितीचा इतक्या कमी वयाचा सभापती प्रथमच निवड झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तर उपसभापती पदी सुनील शिनगारे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांनी भाजपा नेते रमेश आडसकर, राजेभाऊ मुंडे, डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक मागील डिसेंबर महिन्यात झाली. ही निवडणूक सरळ भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी चुरशीची ठरली. यामध्ये भाजपा पुरस्कृत पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा धुवा उडवत त्यांना एका जागेवरच रोखले तर भाजपाचे १७ सदस्य विजयी झाले. यानंतर सभापती, उपसभापती कोण होणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सोमवारी ( दि. २ ) दुपारी सभापती, उपसभापती पदाच्या निवड करण्यात आली. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार मंगेश महादेव तोंडे या २४ वर्षीय तरुणाच्या खांद्यावर सभापतीपदाची जबाबदारी टाकण्यात आली. इतक्या कमी वयातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती होण्याची राज्यातील ही ऐतिहासिक घटना असावी अशी चर्चा होत आहे. प्रत्येक नेता तरुणांनी राजकारणात यावे म्हणून निमंत्रण देतात. पण ते आले तर त्यांचा वापर मागे फिरवून घेण्यासाठी करण्यात येतो हे उघड सत्य आहे. परंतु पंकजा मुंडे यांनी ‘मै सबसे अलग’ हे दाखवून दिले. तालुक्यातील महत्वाच्या संस्थेवर तरुणाची निवड केली. उपसभापतीपदी सुनील शिनगारे यांची निवड बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल दोन्ही नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.