निगरगट्ट जि.प. प्रशासन! आडस येथे एकाच मागणीसाठी महिलेचे तिसऱ्यांदा आंदोलन
यावेळी तरी मागण्या मान्य होतील का? जनतेचा प्रश्न
लोकगर्जना न्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरावस्था झाली असून, धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. या धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना न बसवता नवीन शाळा खोल्यांमध्ये बसविण्यात यावं यासह विविध मागण्यासाठी येथील सविता आकुसकर यांनी शुक्रवार ( दि. १२ ) पासून शाळेतच आंदोलन सुरू केले. याच मागणीसाठी हे तिसरे आंदोलन असून निगरगट्ट जिल्हा परिषद प्रशासन यावेळी तर आंदोलनाची दखल घेऊन कारवाई करेल का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
आडस येथे जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा, कन्या आणि उर्दू अशा तीन शाळा आहेत. या सर्व शाळा पुर्वीच्या टोलेजंग इमारतीत भरतं आहे. परंतु ही इमारत जुनी झाल्याने मोडकळीस आली आहे. पावसामध्ये ती काही ठिकाणी पडली आहे. भिंती निर्जीव झाल्याने ही इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. या इमारतीच्या मागे शाळेच्या नवीन खोल्या बांधल्या आहेत. पण जुन्या इमारतीचा डोलारा उभा असल्याने नवीन खोल्या धुळखात पडलेल्या आहेत. ये जा करण्यासाठी रस्ता ही नाही. त्यामुळे जुन्याच इमारतीत कन्या व उर्दू शाळेचे काही वर्ग भरविले जातात. येथे कधीही धोका होऊ शकतो. म्हणून सविता आकुसकर यांनी नवीन इमारतीत वर्ग भरविले जावे, निकामी झालेली धोकादायक इमारत पाडण्यात यावी, शाळेत शिपाई नियुक्त करावे, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शाळेतील घाण साफ करावी, जि.प. शाळेसाठी स्वतंत्र संरक्षण भिंत बांधावी, खिचडी शिजविण्यासाठी किचन शेड बांधावे या मागणीसाठी शुक्रवार ( दि. १२ ) पासून जिल्हा परिषद शाळेतच आंदोलन सुरू केले आहे. याच मागणीसाठी सविता आकुसकर यांनी सन २०१३ व २०१८ मध्ये आंदोलन केले. त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. परंतु चार वर्षे लोटली तरी काहीच कारवाई केली नाही. जैसे थे अवस्था आहे. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा आंदोलन करण्याची वेळ या महिलेवर आली. यावेळी तरी जिल्हा परिषद प्रशासन काही ठोस कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर आंदोलक महिलेने जुन्या इमारतीला जेसीबी लावल्या शिवाय माघार घेणार नाही. असा ठाम निर्धार केल्याची लोकगर्जना न्यूजशी बोलताना सांगितलं आहे.