नारायणगड रस्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली दोन कोटींच्या कामाला मंजुरी
नारायण गडाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध -सचिन मुळूक
बीड : महाराष्ट्राची धाकटी पंढरी मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे निधी उपलब्ध करून रस्त्याचे कामाला मंजुरी देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्र्यांनी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मंजुरीचे पत्र महंत ह.भ.प. शिवाजी महाराजांकडे सुपूर्द केले
बीड तालुक्यातील बेलुरा ते नारायणगड रस्ता सुधारणा करणे फार गरजेचे झाले होते. लाखो भाविक नगद नारायणाच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. हा रस्ता व्हावा म्हणून यासंदर्भात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दि.२३ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करुन पत्र दिले. या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देऊन जवळपास दोन कोटींचा निधी विशेष बाब म्हणून तत्काळ मंजूर करण्याचे आदेश देऊन कामाला मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या मंजुरीचे पत्र गडाचे महंत ह.भ.प.शिवाजी महाराज यांना शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी सुपुर्द केले. यावेळी गडाचे विश्वस्त बळीराम गवते, गोवर्धन काशीद, सखाराम मस्के यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. दरम्यान, नारायण गडाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील नारायण गडावर श्रद्धा आहे. यापूर्वी राज्य शासनाने गडाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. यापुढेही गडाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बोलण्यापेक्षा आम्ही कृतीवर जास्त भर देतो. लाखो भाविकांची गडावर श्रद्धा असून गडाच्या विकास कामात कोणी आडकाठी आणू नये, अशी हात जोडून गडाचा भक्त म्हणून सर्वांना विनंती करतो.
-सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख, शिवसेना, बीड.