भवताली

नाक दाबल्याशिवाय तोंड उघडतचं नाही! सकाळी आंदोलन अन् रात्री रोहित्र हजर

रेस्ट हाऊस,डुमने, नेटके डीपीच्या रोहित्रांसाठी प्रतिक्षाच

लोकगर्जनान्यूज

चार महिन्यांपासून रोहित्रची प्रतिक्षा होती. परंतु ते येत नसल्याने गुरुवारी ( दि. ६ ) ग्रामस्थांनी हलगीनाद करत रास्तारोकोचा इशारा देताच गुरुवारी रात्री रोहित्र हजर झाले. शुक्रवारी ते बसविण्यात आले. यामुळे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तरीही रेस्ट हाऊस, डुमने, नेटके डीपीच्या रोहित्र आले नाहीत.यासाठीही आंदोलन करावे लागणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

हनुमान मंदिर, रेस्ट हाऊस, डुमने, नेटके ( पेट्रोल पंप ) या चार डीपीचे एकूण ६ सिंगल फेज रोहित्र चार महिन्यापूर्वी जळालेले आहेत. यानंतर बायपास करुन दोन वर तीन रोहित्रांचा भार टाकून वीजपुरवठा सुरू केला. तर हनुमान मंदिर जवळ थ्री फेज एक रोहित्र आहे. त्यावर काही भार टाकून या भागात वीजपुरवठा करण्यात येत होता. यामुळे ना वीज ग्राहकांनी लक्ष दिले ना महावितरण कंपनीने लक्ष दिलं. परंतु चार-पाच दिवसांपुर्वी त्या थ्री फेज रोहित्रामध्ये काहीतरी बिघाड झाला अन् उच्च दाबात वीजपुरवठा येऊन अनेक विद्युत उपकरणे जळून नुकसान झाले. त्यावरून वीजपुरवठा देण्यास अडचण येऊ लागल्याने बराच भाग अंधारात राहु लागला. वीजपुरवठा नसल्याने उष्णतेमुळे त्रास होऊ लागला. यातून या डीपीवरील वीज ग्राहकांनी गावातून हलगी वाजवत कनिष्ठ अभियंता कार्यालय गाठून शनिवार पर्यंत वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. वीजपुरवठा सुरळीत नाही झाला तर शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. आंदोलनाचा इशारा देताच चार महिन्यांपासून रोहित्र उपलब्ध नाही म्हणणाऱ्या कंपनीकडे लगेच दोन रोहित्र उपलब्ध झाली. गुरुवारी रात्री ते आडसमध्ये दाखल झाले अन् शुक्रवारी ( दि. ७ ) ते दुपारी फिट ही झाले. त्यावरून वीजपुरवठा सुरू होईल. मग चार महिने का? उपलब्ध होऊ शकले नाहीत. की , वीजबिल भरुनही सुरळीत वीजपुरवठा व्हावं म्हणून आंदोलनच करावं लागतं. सध्या महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी ग्रामीण भागाला दुय्यम वागणूक देण्यात येत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
योग्य दाबाने वीजपुरवठा करावा – मागणी

आडस येथे मागील काही महिन्यांपासून योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. यामुळे फ्रीजसह इतर विद्युत उपकरणे चालत नसल्याने हॉटेल, ज्यूस बार सह आदि लहान व्यसाईकांचे मोठं नुकसान होत आहे. तसेच सध्या उन्हाळा सुरू असल्याने उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत असून, पंखा सुरू करुन हवेला बसावं तर तेही चालत नसल्याने उष्णतेमुळे आडसकर त्रस्त झाले आहेत. यामुळे येथे योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »