नवविवाहितेचा मृत्यू; तिसऱ्या मजल्यावरून फेकून मारल्याची पित्याची तक्रार
सासरकडील मंडळीवर खूनाचा गुन्हा दाखल
बीड : शहरातील शाहू नगर भागातील नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मयत नवविवाहितेच्या पित्याने तिसऱ्या मजल्यावरुन फेकून मारल्याची तक्रार केल्यानंतर पती, दीर, जाऊ यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने मात्र शहरात खळबळ माजली आहे.
शेख यास्मिन शकुर ( वय २१ वर्ष ) असे मयत नवविवाहितेचे नाव असून अवघ्या ५ महिन्यांपूर्वी यास्मिनचे शाहू नगर मधील शेख शकुर बशीर याच्या सोबत झाले होते. लग्नानंतर यास्मिन यास महिनाभर चांगले सांभाळलं मात्र नंतर सासरकडील मंडळींकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. या बाबतीत तिने आपल्या आई-वडीलांना माहिती दिली परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आज चक्क इमरतीवरुन पडल्याने यास्मिनचा मृत्यू झाल्याचा फोन आला. ती पडली नाही तर तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची फिर्याद शेख रईस शरिफोद्दीन यांनी दिली. त्यावरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपी शेख शकुर बशीर ( पती ), शेख नसीर बशीर ( दीर ), शेख सोफिया नसीर ( जाऊ ) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पती शेख शकुर यास पोलीसांनी ताब्यात घेतले. महिला इमारतीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना समजताच पोलीसांनी धाव घेतली होती.तर नागरीकांनी घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. अंगाची हळद निघण्याच्या आधी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.