आपला जिल्हा

नगरपरिषदेचा वार्षिक निधी, पाणीपुरवठ्यासाठी वर्ग करा – आ.संदीप क्षीरसागर

लोकगर्जनान्यूज

बीड : यावर्षी पावसाची अनियमितता, माजलगाव व बिंदुसरा धरणातील घटलेला पाणीसाठा यामुळे बीड शहरासह ग्रामीण भागात आगामी काळात तीव्र पाणीटंचाई भासू शकते. यात बीड शहराची लोकसंख्या पाहता टॅंकरने पाणीपुरवठा करणे शासनाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. अटल अमृत योजनेचे काम बीड शहरात पूर्ण झालेले आहे. परंतु नगरपालिकेकडे महावितरणची थकबाकी असल्याने या योजनेस नवीन वीज कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे नगरपालिकेला मिळणारा सन २०२३ चा वार्षिक निधी (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजना वगळून) महावितरणला वर्ग करून शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
बीड शहरात सध्या माजलगाव धरणातून २४ एम.एल.टी. व बिंदुसरा धरणातून ७ एम.एल.टी. पाणी पुरवठा होत आहे‌. बिंदुसरा धरणाची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा होऊ शकत नाही. सध्या बीड शहराला गावठाण भागात आठ दिवसाआड तर ग्रामीण भागामध्ये दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे‌. बीड नगर पालिकेने अटल अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत २५ एम.एल.टी. चे काम पूर्ण केले आहे. परंतु बीड नगरपालिकेकडे महावितरणची ३६ कोटी रूपये थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण या योजनेला नवीन वीज कनेक्शन जोडत नाही. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता बीड शहरात तीव्र पाणीटंचाई भासू शकते. बीड शहराची लोकसंख्या अंदाजे ३ लाख आहे. त्यामुळे शहरात टॅंकरने पाणीपुरवठा करणे शासनाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही त्यामुळे नगरपालिकेला मिळणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना वगळता वार्षिक योजनेतील निधी महावितरणकडे वर्ग करून अटल अमृत योजनेंतर्गत बीड शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी पत्राद्वारे आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे केली आहे.

दुष्काळी परिस्थिती असल्याने घरपट्टी, नळपट्टीवरील व्याज माफीची मागणी

दरम्यान १० नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासननिर्णयानुसार बीड तालुक्यातील १० महसूल मंडळे दुष्काळसदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर केले आहेत. यात जमीन महसूलमध्ये सूट देण्याचे निर्देशीत केले आहे. त्याच धर्तीवर, बीड नगरपालिकेकडून घरपट्टी व नळपट्टीवर आकारण्यात येणार्‍या व्याजावर सूट मिळणेबाबतही शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणीही आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »