धारुर तालुक्यातील ‘या’गावात गूढ आवाज व जमीन हादरते; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : तालुक्यातील मोरफळी येथे मागील दोन दिवसांपासून गूढ आवाज व जमीनीला हादरे जाणवत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तालुका प्रशासनाने या गूढ आवाजाची उकल करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
मोरफळी हे डोंगर दरऱ्यातील धारुर तालुक्याच्या सिमेवरचं गाव आहे. येथे मागील दोन ते तीन दिवसांपासून गूढ आवाज होत आहे. यामुळे जमीन हादरत असून नेमकं हा आवाज कुठं होतंय हे लक्षात येत नसून पायाखाली आवाज झाल्याचा भास होतो. अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली. शनिवारी ( दि. १४ ) रात्री ९:३० वाजता व रविवारी ( दि. १५ ) सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या आवाजाची तीव्रता खूप होती. यामुळे भूकंप प्रमाणे पुर्ण जमीन हादरली तसेच घराच्या भिंती हलत असल्याचे दिसून आले. सलग दोन ते तीन दिवसांपासून असे प्रकार घडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी तालुका प्रशासनाने लक्ष घालून या गूढ आवाजाचे नेमकं कारण काय? याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपूर्वी याच परिसरातील केज तालुक्यात येत असलेल्या केकाणवाडी येथे गूढ आवाज येत होते. तेव्हा संबंधित तज्ञांनी जमीनीतील पाणी पातळी वाढल्याने पोकळी भरून निघत असल्याने आवाज होत असल्याचा निष्कर्ष लावला होता. मोरफळी येथील प्रकार असाच आहे की, वेगळे काही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
* गूढ आवाज व जमीन हादरते
दोन ते तीन दिवसांपासून गूढ आवाज येत आहे. ते कोणत्या दिशेने येतेय हे समजत नाही. दोन दिवस कोणी विहीरीत आवाज घेत असेल असे वाटले परंतु शनिवारी रात्री ९:३० वाजता मोठा आवाज झाला. यामुळे जमीन हादरून वर ठेवलेली भांडे खाली पडले. पाया खालीच आवाज झाला अशी जाणीव झाली. यामुळे भीती वाटत आहे. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ मधुकर गडदे यांनी दिली आहे.