धारुर तालुक्यातील धक्कादायक घटना! घरातील गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुण ठार

किल्लेधारूर : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यामध्ये २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना धारुर तालुक्यातील पिंपरवाडा येथे आता काही वेळापूर्वी घडली आहे.
रविराज श्रीहरी तिडके ( वय २२ वर्ष ) रा. पिंपरवडा ता. धारुर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो घरात असताना आज मंगळवारी ( दि. २९ ) दुपारी अचानक घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे रविराज दूर फेकला गेला. स्फोटचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तर पुर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते तर रविराजलाही आगीने विळख्यात घेतले होते. त्यास विझवून तातडीने धारुर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग ओकत असलेला सुर्य व त्यात गॅसच्या स्फोटाने आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने धारूर व केजच्या अग्निशमन बंब पाचारण करून आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत घर पुर्ण जळून खाक झाले. या आगीने तरुणाला ही हिरावून घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.