धारुरकरांचे स्वप्न साकार करणाऱ्या मावळ्यांवर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव
आमदार सोळंके यांची पुतळा कायम ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमी मावळ्यांनी आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चौथऱ्यावर बसवून शहरासह तालुक्यातील शिवप्रेमींचे स्वप्न साकार केले. यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याप्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांनी धारुर येथील शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जनसामान्यांच्या भावनांचा आदर करुन पुतळा आहे तसा कायम ठेवण्याची मागणी केली.
धारुर येथील बसस्थानक समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळा असावा अशी शिवप्रेमींची चार दशकांपासून मागणी आहे. हे शहरासह तालुक्याचे स्वप्न आहे. याचा प्रस्ताव ही शासनाकडे सादर करण्यात आला असून नगर परिषदेने अश्वारूढ पुतळ्याच्या हिशोबाने चौकामध्ये चौथरा बांधलेला आहे. परंतु तो फक्त चौथराच राहिला होता. परंतु काही शिवप्रेमींनी या कानाची त्या कानाला पत्ता न लागु देता येथील चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आज शुक्रवारी पहाटे स्थापन केली. ही बातमी समजताच छत्रपती शिवरायांचा पुतळा पहाण्यासाठी चौकात मोठी गर्दी जमली होती. यानंतर प्रशासनाने गर्दी कमी करत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. प्रशासन काय निर्णय घेणार याकडे शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धारुर येथील शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांची बीड येथे भेट घेतली. यावेळी शिवप्रेमी आणि जनभावनेचा आदर करत चौकातील बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कायम स्वरुपी ठेण्याची मागणी केली आहे. हा पुतळा बसविणाऱ्या शिवप्रेमी तरुणांवर सोशल मीडियावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.