धाडसी चोरी; ४८ लाखांची रोकड लंपास!
परळी : तालुक्यातील कौडगाव घोडा येथील पोर्णीमा काँटन जिनिंग ॲन्ड प्रेसिंग मधील तिजोरीतील रोकड ४७ लाख ७८ हजार ४०० रु. लंपास झाले. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करीत आहेत. चोरट्यांनी आता जिनिंगकडे मोर्चा वळवला की, काय ? असा संशय व्यक्त करण्यात येत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
ओंकार उत्तमराव खुर्पे ( वय ४० वर्ष ) रा. माजलगाव यांची सदरील जिनिंग ॲन्ड प्रेसिंग फॅक्टरी आहे. येथे सरकी वेगळी करुन कापसाचे गठाण तयार होतात. यासाठी लागणाऱ्या कापसाची शेतकरी, व्यापारी यांच्याकडून कापूस खरेदी केली जाते. त्यासाठी येथे रोख रक्कम असते. शनिवार व रविवार असे सलग बँकेस दोन दिवस सुट्टी आल्याने कापूस खरेदीसाठी अडचण येऊ नये म्हणून जिनिंगचे कॅशीअर अशोक भिमराव साळुंके व निलेश विलासराव देशमुख यांनी परळी येथील बँकेतून ( दि . २४ ) ५० लाख रुपये आणले. यातून काही रक्कम त्याच दिवशी शेतकऱ्यांना वाटप केली. रात्री हिशोब करुन शिल्लक रोकड ४७ लाख ७८ हजार ४०० जिनिंग मधील तिचोरीत ठेवले. त्याच रात्री सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ग्रेडर कारभारी कचरु हारकाळ यांनी ओंकार खुर्पे यांना फोनद्वारे तिजोरीतील रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची माहिती दिली. त्यांनी तातडीने सिरसाळा पोलीसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून ओंकार खुर्पे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.