धक्कादायक! सहा महिन्यांची नकोशी पिशवीत घालून फेकली;परळी तालुक्यातील घटना
लोकगर्जनान्यूज
परळी : एक सहा महिन्यांची चिमुकलीला एका पिशवीत घालून रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात सोमवारी रात्री उघडकीस आली. नशीब बलवत्तर म्हणून ही चिमुकली पोलीसांच्या सतर्कतेमुळे वाचली असून अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी ( दि. ८ ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मालेवाडी ( ता. परळी ) रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत जिवंत बालक फेकून दिल्याची माहिती पोलीसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदरील पिशवीत बेडशीट मध्ये गुंडाळून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फेकून दिले. पोलीसांनी तातडीने चिमुकलीला प्रथम परळी येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. येथे उपचार करुन नंतर अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल केले. ही घटना उघडकीस येताच जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. पाच दिवसांपूर्वीच गेवराई येथे अवैध गर्भपात केंद्रावर छापा मारुन पर्दाफाश केला. त्यातही पुन्हा ही घटना घडली असल्याने काही लोकांना मुलगी नकोशी असल्याचे दिसून येत असलेतरी मागील वर्षभरातील एमपीएससी परीक्षा निकालावर नजर टाकली तर मुलीचं यशस्वी आहेत. तरीही लोकांची मानसिकता का बदलत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.