धक्कादायक! लष्करी हद्दीतील बॉम्ब चोरुन शेतात पुरला…?
पोलीस व लष्कर पथकाने निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली
अहमदनगर : येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रक्षेत्रात प्रवेश करून तेथून दोघांनी मिसफायर झालेला जिवंत बॉम्ब चोरुन आणून शेतात पुरुन ठेवला. याची गावात चर्चा सुरू झाली. ही चर्चा जनतेतून पोलीस पर्यंत पोचली घटनेचं गांभीर्य ओळखून लष्करी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. लष्कराचे पथक व पोलीस यांनी शेतात पुरलेला बॉम्ब शोधून काढून निष्क्रिय केला. जर हा बॉम्ब फुटला असतातर पुर्ण गावाला धोका निर्माण झाला असता. तसेच स्वतः चे व इतरांच्या जीविताला धोका होईल असे कृत्य केले म्हणून दोघांवर लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉम्ब चोरणाऱ्या दोघांच्या ही पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.ज्ञ
लष्कराचे प्रशिक्षण केंद्र हा परिसर के.के. रेंज या नावाने ओळखले जाते. के.के. रेंज हा परिसर नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहे. परंतु काही जण येथील भंगार गोळा करण्यासाठी या क्षेत्रात नजर चुकवून प्रवेश करतात. येथील पडलेलं भंगार चोरुन नेहतात. असेच दोन-तीन दिवसांपुर्वी ढवळपुरी ( ता. पारनेर ) येथील दोघे जण के.के. रेंज परिसरात गेले होते. येथे त्यांना मिसफायर झालेला जिवंत बॉम्ब दिसला. तो दोघांनाही चोरुन आणून घरा जवळील शेतात पुरुन ठेवला. काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याची गावात कल्पना दिली. गावात बॉम्ब आणून पुरुन ठेवल्याची जोरदार चर्चा झाली. ही चर्चा पारनेर पोलीसांपर्यंत पोचली. गांभीर्य ओळखून पारनेर पोलीसांनी लष्करी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच लष्कराची एक तुकडी व पोलीस यांनी ढवळपुरी येथे धाव घेतली. शेतात पुरुन ठेवलेला बॉम्ब शोधून काढलं व तो निकामी केला. जर हा बॉम्ब फुटला असतातर पुर्ण गावाला धोका झाला असता असे सांगितले जात आहे. परंतु ते लष्कराने ताब्यात घेऊन निष्क्रिय केल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच या प्रकरणी लष्कराचे जवान बंडु उत्तम येणारे यांच्या फिर्यादीवरून अमित संतोष गोंधळे, जय राम चौधरी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे.