क्राईम

धक्कादायक! पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू; आष्टी जवळील संकनपूरी येथील घटना

 

लोकगर्जना न्यूज

शाळा सुटल्यानंतर तीन मित्र घरी जाण्याऐवजी गावालगत असलेल्या नदीवर पोहायला गेले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून तिघांचा ही मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना संकनपूरी ( ता. परतुर जि. जालना ) येथे काल गुरुवारी घडली असून, या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. दप्तर नदीच्या काठावर दिसून आल्यामुळे घटना उघडकीस आली.

उमेश बाबासाहेब नाचण ( वय १० वर्ष ) , करण बाळासाहेब नाचण ( वय १० वर्ष ), अजय रघुनाथ टेकाळे ( वय १३ वर्ष ) असे मयत मुलांची नावे आहेत. हे तिघेही मित्र असून, परतुर तालुक्यातील आष्टी जवळील संकनपूरी ( जि. जालना ) येथील रहिवासी असून ते गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. काल गुरुवारी शाळा सुटल्यानंतर ते घरी येण्याऐवजी पोहण्यासाठी गावा लगत असलेल्या नदीवर गेले. शाळा सुटून बराच वेळ झाला परंतु मुलं घरी परतली नाही. कुठं गेली म्हणून शोधाशोध सुरू केली. यावेळी तीन दप्तर नदीच्या काठावर असल्याची माहिती मिळाली. सर्वांनी तिकडे धाव घेतली असता डोहात तिघे बुडाल्याचे दिसून आले. ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. तरुणांनी डोहात उड्या घेऊन तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढले रात्री ८ च्या नंतर तिघांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला. गावातील तीन मुले बुडून मृत्यू पावल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, गावामध्ये तर रात्री चुल पेटली नाही. संकनपूरी येथे भेट देऊन तहसीलदार यांनी मयत मुलांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »