कृषी

धक्कादायक! पीक कापणी प्रयोगात वजन वाढवण्यासाठी दगड टाकण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हणून पाडला

लोकगर्जना न्यूज

केज : तालुक्यातील कळमअंबा येथे शनिवारी ( दि. ८ ) कृषी विमा कंपनीकडून पीक कापणी प्रयोग करण्यात आला. यावेळी अर्धा गुंठ्यांत केवळ ३.८७५ कि.ग्रा. सोयाबीनचे वजन आले. हे‌ वजन खूप कमी असल्याने विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दगड टाकून वजन वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु जागरुक शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच आहे तेच वजन घ्या म्हणून धारेवर धरले. वजन वाढविण्याचा प्रयत्न हाणून पाडला. यामुळे शेतकऱ्यांनी पीक कापणी वेळी जागरूक राहून आहे ते वजन घेण्यासाठी भाग पाडावे. अन्यथा ५ किलो वजन गेले तर विमा मिळणार नाही. शेतकऱ्यांनी केलेल्या या दाव्याची दखल घेऊन प्रशासनाने चौकशी करून सत्यता तपासून पहावी अशी मागणी केली जात आहे.

पावसा अभावी सोयाबीन करपून गेल्यामुळे उत्पादन घटले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे रॅंडम सर्वे ही झाले. परंतु विमा कंपनीने विमा देण्यास नकार दिला. कसेबसे २० महसूल मंडळांची निवड केली. त्यानंतर सोयाबीन पेरणी आणि उतरविलेला विमा यात क्षेत्रफळ तफावतीवर बोट ठेवल्याने त्या २० महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ॲग्रीम मिळणार की, नाही? याबाबत शंका आहे. आता विमा कंपनीकडून पीक कापणी प्रयोग सुरू झाले आहे. शनिवारी ( दि. ८ ) कळमअंबा ( ता. केज ) येथील शेतकरी मुकुंदराज जाधव यांच्या शेतात पीक कापणी प्रयोग साठी बीड जिल्ह्यासाठी नियुक्त कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच आले. यावेळी अर्धा गुंठ्यांतील सोयाबीन उपटून त्यातील बिया काढून वजन केले. त्याचे वजन केवळ ३.८७५ कि.ग्रा. झाले. हे वजन म्हणजे उतार खूप कमी झाले. वजन वाढवण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सोयाबीन मध्ये चक्क दगड टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उपस्थित जागरुक शेतकरी अश्विन टोंपे यांच्या लक्षात आलं. त्यांनी यास विरोध केला. परंतु विमा कंपनीचे प्रतिनिधी ऐकून घेण्यास तयार नव्हते. यामुळे उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी विरोध करत आहे तेच वजन घ्या म्हणून धारेवर धरले. अन्यथा लेखी द्या म्हणून मागणी केली. यानंतर विमा प्रतिनिधींनी फोनवर वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर आहे ते वजन घेतले. पीक विमा देण्याची गरज पडू नये म्हणून विमा कंपनीचे प्रतिनिधी दगड,माती टाकून पीक कापणी प्रयोगात ५ किलो वजन वर देत असल्याचा आरोप कळमअंबा येथील अश्विन टोंपे, मुकुंदराज जाधव, रणजित सावंत यांनी केला. कळमअंबा येथील रणजित सावंत यांच्या शेतात दगड टाकून वजन वाढवले असल्याचे त्यांनी सांगितले परंतु ते शेतात एकटेच असल्याने विरोध करू शकले नाही. त्यामुळे पीक कापणी प्रयोगा वेळी शेतकऱ्यांनी जागरुक रहावे. वजन किती आले, यामध्ये काही चलाखी झाली का? वजन आले तेवढं घेतला आहे का? हे तपासून पाहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »