धक्कादायक! पाच ऊसतोड मजूर महिला तलावात बुडून ठार; बीड जिल्हा लगतची घटना
लोकगर्जना न्यूज
ऊसतोड मजूर असलेल्या दोन महिला व तीन मुली धुणे धुण्यासाठी तलावावर गेल्या होत्या. यावेळी एक मुलगी पाण्यात बुडत असल्याने तिला वाचविण्यासाठी चार जणींनी उड्या घेतल्या अशा पाचही जणींचा पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदपूर तालुक्यातील किनगाव जवळ घडली आहे. मयत पाचही परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पालम तालुक्यातील मोजमाबाद तांडा आणि रामपूर तांडा येथील ऊसतोडणीसाठी मजुर आलेले असून ते मागील ५ महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यातील साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी आले असल्याचे सांगितले जात आहे. आज शनिवार ( दि. १४ ) सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास आई, दोन मुली व इतर दोन असे पाच जणी शेततलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान एका मुलीला पाण्याचा अंदाज आला नाही. ती आत गेल्याने पाण्यात बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी चौघींनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र त्याही बुडून पाचही जणींचा मृत्यू झाला. सुषमा संजय राठोड, अरुणा गंगाधर राठोड दोघी रा. मोजमाबाद तांडा ( ता. पालम जि. परभणी ), दिक्षा धोंडिबा आडे, काजल धोंडिबा आडे, राधाबाई धोंडिबा आडे या तीन माय लेकी रा. रामपूर तांडा ( ता. पालम जि. परभणी ) यांचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पाचही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आली असून अंत्यविधीसाठी त्यांच्या मुळगावी घेऊन गेले असल्याचे सांगितले जात आहे.