धक्कादायक! परळी पोलीस ठाण्यात एकाचा मृत्यू; पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप
लोकगर्जनान्यूज
परळी : येथील चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या इसमाचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याची घटना परळी शहरात घडली आहे. हा मृत्यू पोलीसांनी अमानुष मारहाण केल्यामुळे झाल्याचा धक्कादायक आरोप मयताच्या मुलाने केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रात्री पासून पोलीस ठाण्यात गर्दी केली. पोलीस अधीक्षकांनी परळी येथे भेट दिली.
मयत जरीन खान सुजात अलीखान ( वय ४८ वर्ष ) रा. मलीकपूरा परळी यास पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु मंगळवारी रात्री जरीन खानचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. ही बातमी समजताच नातेवाईकांनी रात्री पासून पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. याप्रकरणी मयताचा मुलगा समीर खान याने पोलिसांवर गंभीर आरोप करत पोलीसांनी अमानुष मारहाण केल्यामुळे वडीलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी परळी येथे भेट दिली आहे. मागील काही दिवसांपुर्वीच एका आरोपीचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याने संबंधित पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली. ती घटना आणखी लोक विसरले नाहीत तोपर्यंत ही घटना घडली आहे. यामध्ये काय होणार? याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. जरीन खान यास शहरात आठवडाभरा पुर्वी घडलेल्या चोरी प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते असे सांगितले जात आहे.