धक्कादायक! ‘तो’ अपघात नव्हे घातपात: परळी पोलीसांनी लावला छडा
लोकगर्जनान्यूज
परळी : येथील उड्डाणपूलावर शनिवारी ( दि. २५ ) अपघातात एक ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. परंतु घटनास्थळी पाहणी केली असता पोलीसांना वेगळाच संशय आला. संभाजीनगर पोलीस ठाणे प्रमुख सलीम चाऊस यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देत तपास सुरू केला. यामध्ये हा अपघात नसून घातपात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. गावातील एकाने अपघाताचा बनाव करुन काटा काढल्याचे समोर आले. यातील संशयित आरोपीलाही पोलीसांनी ताब्यात घेत अवघ्या तासाभरात या घटनेचा छडा लावला आहे.
काल शनिवारी उड्डाणपूलावर पिक अप आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये संपत्ती भारत पारवे ( वय 23 वर्ष ) रा. डाबी ( ता. परळी ) हा जागीच ठार झाला तर निकम केरबा एंगडे हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दिले. यावेळी घटनास्थळाची पाहणी केली असता पोलीसांना वेगळाच संशय आला. त्यांनी हा अपघात नसून खून असल्याचं संशय व्यक्त केला. त्या दिशेने तपास सुरू केला असता मयत तरूणाने मागे गावातील एका महिलेची छेड काढली होती. अशी माहिती मिळाली या दिशेने तपास करत अखेर संशय खरा ठरला, छेड काढलेल्या महिलेच्या दिराने तोच राग मनात धरून हा बनाव करत संपत्तीचा काटा काढला असा संशय व्यक्त करत याप्रकरणी संशयित आरोपी अंबाजोगाई येथून ताब्यात घेतला आहे. पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली परळी संभाजीनगर पोलीसांनी कामगिरी बजावली आहे.