धक्कादायक! चार लेकरांसह आईची आत्महत्या

अंबड : तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील एका महिलेने चार लकरांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून मृतदेह पाहून मन सुन्न झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी ( वय ३० वर्ष ) , भक्ती ज्ञानेश्वर आडाणी ( वय १२ वर्ष ) , ईश्वरी ज्ञानेश्वर आडाणी ( वय १० वर्ष ) , अक्षरा ज्ञानेश्वर आडाणी ( वय ८ वर्ष ) , युवराज ज्ञानेश्वर आडाणी ( वय ६ वर्ष ) असे मयताचे नावे आहेत . आज ( दि. ३१ ) सकाळी ९ वाजता या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि शितलकुमार बल्लाळ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. विहीरितून मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवले आहेत. गुरुवारी दुपारपासून सदरील महिला लेकरांसह घरातून निघून गेली असल्याचे सांगितले जात आहे. रात्रीपर्यंत पती व नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु मिळून आले नाही. आज सकाळी ९ च्या सुमारास शोध सुरू असताना गावालगत असलेल्या एका विहिरीत मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये आई, तीन मुली, एक मुलाचा समावेश आहे. या घटने मागील कारण समजु शकलं नाही.