धक्कादायक! ऊसतोडणीसाठी येत नसल्याने महिलेला विषारी द्रव्ये पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

लोकगर्जनान्यूज
केज : ऊसतोडणीसाठी आमच्या सोबत का येत नाही म्हणत ३६ वर्षीय महिलेला विषारी द्रव्ये पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील जोला येथे घडली आहे. याप्रकरणी तीन आरोपी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
राहीबाई अशोक ढाकणे ( वय ३६ वर्ष ) रा. जोला ( ता. केज ) ही महिला रविवारी ( दि. २३ ) घरात एकटी असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अशोक, अच्युत, दैवशाला ढाकणे हे तीघे घरी आले. यांनी राहीबाईला तु आमच्या सोबत ऊसतोडीसाठी का येत नाही? असा जाब विचारला. त्यांना मागील काही रक्कम दिली नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी केसाला धरुन खाली पाडले व एकाने कोणतेतरी विषारी द्रव्ये असलेली बाटली काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी द्रव्ये जबरदस्तीने पाजले. यानंतर सदरील महिलेला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राहीबाई ढाकणे यांच्या जबाबावरून केज पोलीस ठाण्यात आरोपी अच्युत अण्णासाहेब ढाकणे, दैवशाला ढाकणे, अशोक ढाकणे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करत आहेत. चक्क महिलेला विषारी द्रव्ये पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने केज तालुक्यात खळबळ माजली आहे.