द बर्निंग बस! साखर झोपेत काळाची झडप; होरपळून ११ प्रवासी ठार १७ जखमी

लोकगर्जना न्यूज
नाशिक : येथे पहाटे द बर्निंग बसचा थरारक घटना घडली. खाजगी बस व टिप्परची धडक झाली. यानंतर बसने पेट घेतला. यामध्ये ११ प्रवासी ठार तर जखमी १७ आहेत. मयतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ येथून मुंबईला जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस व कोळसा घेऊन जाणारे टिप्परची धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्सची डिझेल टाकी फुटली अन् बसने पेट घेतला असल्याचे सांगितले जात आहे. सदरील घटना आज पहाटे नाशिक येथे औरंगाबाद रस्त्यावर मिरची हॉटेल चौकात घडली आहे. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी साखर झोपेत होते. यामुळे बसला लागलेली आग लक्षात आली नाही. अन् ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मयतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. काहींनी बसमधून बाहेर उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले. आरडाओरडा ऐकून बाजुचे लोक मदतीसाठी धावून आले. त्यांनी मदत केल्याने अनेकांचे प्राण वाचले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन बचाव कार्य करत बसमधून प्रवाशांना बाहेर काढले. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते हा आकडा अद्याप समोर आला नाही. परंतु मयत ११ असून जखमी कोणी १७ तर कोणी २९ म्हणत आहे. काही वेळात अधिकृत माहिती समोर येईल. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
५ लाखांच्या मदतीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत व जखमींवर सरकारकडून उपचार करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.