आपला जिल्हा

दुसऱ्यांसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या शूर विरांना बळ देणारं माजलगाव

शहीद जवान राजशेखर मोरेंच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत

लोकगर्जना न्यूज

बीड : डॉ. फपाळ यांचा मृतदेह शोधताना कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापनाचे जवान राजशेखर मोरे हे धरणात बुडून शहीद झाले. यामुळे कुटुंबाचा आधार हरवला. गेलेलं व्यक्ती परत आणता येत नाही. परंतु कुटुंबाला आधार देता येतो म्हणून माजलगाव करांनी ‘एक हात मदतीचा ‘ फेरी काढून २५ लाखांची मदत जमा केली. यासाठी सर्वांनीच हात देत आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या शूर विरांना बळ देणारं माजलगाव अशी ओळख निर्माण केली. सदरील रक्कम प्रशासनाकडे जमा करण्यात आली असून लवकरच कुटुंबाला ती देण्यात येणार आहे. तसेच धारुर, तेलगाव, दिंद्रुड, टाकरवण येथून ही ऑनलाईन पद्धतीने मदत करण्यात आली.

तेलगाव येथील अजिंक्य हॉस्पिटलचे डॉ. दत्तात्रय फपाळ हे रविवारी ( दि. १८ ) सकाळी माजलगाव येथे धरणावर नेहमी प्रमाणे पोहण्यासाठी गेले. पोहताना ते धरणात लांब पर्यंत गेले परत काठावर येताना दम लागून ते बुडाले. सदरील माहिती प्रशासनाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन प्रथम बीड व परळी येथील आपत्ती व्यवस्थापनाचे पथक पाचारण करण्यात आले. या दोन्ही पथकांनी रविवारी दिवसभर शोध घेतला परंतु फपाळ यांचा मृतदेह शोधण्यात यश आले नाही. अंधार पडत असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. यानंतर प्रशासनाने कोल्हापूर येथून आपत्ती व्यवस्थापन पथक पाचारण केले. तेथून स्कुबा ड्रायव्हिंग चे दहा जणांचे पथक सोमवारी ( दि. १९ ) सकाळी माजलगाव धरण येथे दाखल झाले. त्यांनी शोध कार्य सुरू केले. यावेळी राजशेखर प्रकाश मोरे आणि शुभम काटकर हे दोन जवान धरणात बुडी घेऊन तळाला जाऊन मृतदेहाचा शोध घेताना दोघेही मासेमारी साठी लावण्यात आलेल्या जाळ्यात अडकले. यावेळी सहकार्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शुभम काटकर या जवानाला बाहेर काढण्यात यश आले. परंतु राजशेखर मोरे यांचा ऑक्सिजन मास्क निघाला व ते पाण्यात बुडाले. त्यांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांच्या काही शोध लागत नव्हता. अखेर तीन ते चार तासांनी ते मासेमारी करणाऱ्या कोळी महिलांनी शोधासाठी फेकलेल्या गळाला लागून आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला. मोरे यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृतदेह शोधताना कोल्हापूर येथील एनडीआरएफचा जवान बुडून शहीद झाल्याची बातमी पसरली. या बातमीने बीड जिल्हा हळहळला तर माजलगाव करांचे डोळे पाणावले होते. राजशेखर मोरे हे एक प्रशिक्षित, निडर, शूर असे कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाचे जवान होते. त्यांनी अनेक ठिकाणी धाडसाने बचाव कार्य करत अनेकांना पूर परिस्थिती असो की, कोणतीही आपत्ती आपल्या जीवाची बाजी लावत संकटात सापडलेल्यांना सुरक्षित बाहेर काढून प्राण वाचवले आहेत. परंतु बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात मृत्यू त्यांच्या प्रतिक्षेत होता. येथे येताच त्याने डाव साधला. तर राजशेखर मोरे यांना शासकीय नोकरी नव्हती त्यामुळे शासनाची मदत मिळेल की, नाही. याची खात्री नाही. राजशेखर मोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. राजशेखर यांच्या वरच कुटुंबाची जबाबदारी होती. परंतु आधारच हरवलं. ही माहिती माजलगाव करांना माहिती मिळाली. मुलांच्या डोक्यावरील हरवलेली बापाची सावली व कुटुंबाचा आधार परत आणता येत नाही परंतु कुटुंबाला पुढे येणाऱ्या अडचणी जाणवू नये आणि कृतज्ञता म्हणून पत्रकार, व्यापारी, सामाजिक संस्था, राजकीय व्यक्ती यांनी मिळून बुधवारी ( दि. २१ ) माजलगाव मध्ये ‘ एक हात मदतीचा ‘ फेरी काढली. यावेळी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते सह सामान्य माणसांनी सहभागी होत राजशेखर मोरे यांच्या कुटुंबासाठी सढळ हाताने मदत केली. या फेरीत १९ लाख २५ हजार १५० रु. अशी मदत जमा झाली. त्यात पुन्हा ऑनलाईन पद्धतीने मदत करण्याचे आवाहन करत क्यूआर कोड व्हायरल करण्यात आला. या द्वारे ही बँक खात्यात ६ लाख ४१ हजार रुपये जमा झाले. असे एकूण २५ लाख ६६ हजार १५० रु. मदत जमा झाली. ही मदत पहाता माजलगाव करांचे कौतुक करण्यात येत आहे. आपत्ती काळात असे अनेक जवान आपल्या कुटुंबाची काळजी न करता जीवाची बाजी लावून दुसऱ्यांचे प्राण वाचवतात. मृतदेहाचा शोध घेतात अशा शूर विरांना बळ देण्याचे काम माजलगावच्या जनतेनं केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या व्यतिरिक्त ही धारुर, दिंद्रुड, तेलगाव, टाकरवण येथे ही जनतेला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. येथून ही ऑनलाईन पद्धतीने मदत करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »