दुर्दैवी घटना!केज तालुक्यात घरावर राष्ट्रीय ध्वज लावताना विजेचा धक्का लागू तरुणाचा मृत्यू
लोकगर्जना न्यूज
केज : तालुक्यातील वरपगाव येथून दुर्दैवी घटना उघडकीस आली. घरावर राष्ट्रीय ध्वज लावताना स्टीलचा पाईप विद्युत तारेला लागल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला.
शेख मुख्तार ( वय ३० वर्ष ) रा. वरपगाव ( ता. केज ) असे मयत तरुणाचे नाव आहे. मुख्तार हे आपल्या कुटुंबासह वरपगाव येथे रहातात. देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षा निमित्ताने ‘हर घर तिरंगा ‘ अभियान देशभरात राबविण्यात येत असून, १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यास प्रतिसाद देत मुख्तार यांनी सकाळीच घरावर राष्ट्रीय ध्वज लावला होता. परंतु हवेने पाईप झुकल्याने ती व्यवस्थित करून लावताना जवळून गेलेल्या विद्युत तारेला झेंड्याचा पाईप चिटकला व विजेचा धक्का लागून शेख मुख्तार हे फेकले गेले. तातडीने त्यांना केज येथे दवाखान्यात घेऊन आले असता तपासणी करुन डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना दुर्दैवी घटना घडल्याने वरपगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.