दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर; धारुर तालुक्यातील घटना
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : तालुक्यातील तेलगाव येथे रस्ता ओलांडताना दुचाकीची जबर धडक बसून डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची तर दुचाकीस्वार धडक लागताच रस्त्यावर पडल्याने मार लागून गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री सरस्वती विद्यालय समोर ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
महादेव निवृत्ती शेळके रा. तेलगाव ( ता. धारुर ) असे मयताचे नाव आहे . विशाल साळवे रा. कोळपिंप्री ( ता. धारुर ) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. मंगळवारी रात्री विशाल साळवे हा दुचाकी क्र. एम.एच. ४४ एए ३६७७ वरुन भरधाव वेगाने धारुर येथून तेलगाव कडे येत होता. दरम्यान तो तेलगाव येथील सरस्वती विद्यालय समोर आला असता यावेळी रस्ता ओलांडत असलेले महादेव शेळके यांना दुचाकीची धडक लागली. धडक बस्ताच दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात महादेव शेळके यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. दुचाकी चालक विशाल साळवे हा गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दवाखान्यात पाठवून दिले. तर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.