दुचाकीला याशिवाय पेट्रोल नाही

बीड : जिल्ह्यात नो हेल्मेट नो पेट्रोल चे धोरण राबविण्यात येत आहे. हेल्मेट परिधान केल्याशिवाय दुचाकीस्वारास पेट्रोल / डिझेल/ एल.पी.जी गॅस देण्यात येऊ नये असे बीड जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकी धारकांना हेल्मेट हा एक जोडीदार सोबत ठेवावा लागणार आहे.
हेल्मेट शिवाय दुचाकीस्वारांना पेट्रोलपंप परिसरात पुर्णपणे बंदी घालण्यात येईल. कुठल्याही परिस्थितील हेल्मेट नसलेले दुचाकीस्वार यांना पेट्रोल पंप परिसरात प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक पेट्रोल पंप मालक चालक यांनी या संबंधात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे आदेश ठळकपणे प्रथम दर्शनी भागात लावून घ्यावे. नियम तोडून पंप परिसरात हेल्मेट शिवाय प्रवेश दिल्यास पेट्रोलियम नियम 2002 चे नियम 150 प्रमाणे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. शाळा, कॉलेजसह सर्व प्रकारचे शासकीय, निमशासकीय कार्यालयात ही हेल्मेट सक्ती करण्यात आली. वाढते अपघातातील दुचाकीस्वारांचे वाढते मृत्यूचे प्रमाण पहाता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हेल्मेट शिवाय दुचाकीस्वार सापडल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 (ब)(क) अन्वये दि. 01 जानेवारी 2022 पासून कार्यावाही करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जयंत चव्हाण यांनी कळविले आहे.
त्यामध्ये दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट धारण न केल्यास 500 रुपये दंड व 3 महिन्यांकरीता लायसन्स निलंबन करण्यात येते.त्यामुळे हेल्मेटचा वापर करा असे आवाहन करण्यात आले.