दिलासादायक: नगर रोडची दुरूस्ती नव्हे तर सिमेंट कॉंक्रीटचा नवा रस्ता होणार
आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याचे फलित
लोकगर्जना न्यूज
बीड : अनेक दिवसांपासून बीड शहरातील सर्वात महत्वाचा आणि जिल्हा न्यायालयासह, सर्व विभागाचे जिल्हा मुख्यालये असलेल्या नगर रोडवरील खड्ड्यांमुळे नागरीकांचे प्रचंड हाल सुरू आहेत.परंतु हे हाल आता थांबणार आहेत. आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे सिमेंट- कॉंक्रीटचा नवीन रस्ता होणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
बीड शहरासह जिल्ह्याभरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला नगर रोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. नगर रस्त्याची सध्यस्थितीला अक्षरशः चाळण झाली असून,नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. नगर रोड रहदारी योग्य राहीला नसल्याचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. राष्ट्रीय महामार्ग (NH 561) असलेला हा रस्ता बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातंर्गत शिरापूर धुमाळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी या रस्ता संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या रस्ताकामाची सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून पुढील बाबींच्या पुर्ततेनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिरापूर धुमाळ पर्यंतचा संपूर्ण रस्ता सिमेंट-कॉंक्रीटचा होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरासह जिल्हाभरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.