क्राईम

दिलासादायक! ऑनलाईन चोरलेली रक्कम बीड सायबर पोलीसांनी खातेदाराला मिळवून दिली

आठ दिवसातील रक्कम परत मिळवण्याची दुसरी कामगिरी

लोकगर्जना न्यूज

बीड : शहरातील एका शिक्षिकेच्या बँक खात्यातून अज्ञाताने परस्पर १ लाख ३१ हजार ३६७ रु. ऑनलाईन पद्धतीने लंपास केले. याप्रकरणी बीड सायबर पोलीसांनी तपास करुन सदरील रक्कम पुन्हा संबंधित खातेदाराला मिळवून दिली. आठवडाभरात रक्कम परत मिळवून देण्यात बीड पोलीसांना दुसऱ्यांदा यश आले. या कामगिरीबद्दल नागरीकांमधून कौतुक करण्यात येत आहे.

ऑनलाईन पद्धतीने सध्या आर्थिक व्यवहार वाढले असून यामुळे नागरिकांची सोय झाली. परंतु धोकेही वाढले आहेत. अनेक ठग फोन करुन, मेसेज सह विविध प्रकारच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने परस्पर कोणाच्याही खात्यातून रक्कम लंपास करत आहेत. एकदा रक्कम खात्यातून गेली की, ती परत मिळेल की, नाही याची शाश्वती नाही. परंतु बीड सायबर पोलीसांनी अशी रक्कम ही परत फिर्यादीला मिळवून दिली. ही बाब नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. बीड शहरातील शिक्षिका मिर्झा कौसरजंहा मंसुर बेग एका अनोळखी व्यक्तीचा २९ जानेवारी २०२२ फोन आला. त्याने आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलतो अशी थाप मारुन कौसरजंहा यांच्याकडील दोन क्रेडिट कार्डची माहिती घेतली. यानंतर काही वेळातच एका कार्डमधून ९० हजार ९०० तर दुसऱ्या मधून ४० हजार ४६७ असे एकूण १ लाख ३१ हजार ३६७ रु. परस्पर लंपास केले. याप्रकरणी सदरील फसवणूक झालेल्या शिक्षिकेने २ फेब्रुवारी २०२३ रोजी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल झाला. याचा तपास करत बीड पोलीस सायबर सेलने हे पैसे कुठे गेले याचा छडा लावला व ती पूर्ण १ लाख ३१ हजार ३६७ रु. परत मिळवून दिले. यापुर्वीही एका अशाच फिर्यादीला ३ लाख रुपये परत मिळवून दिले आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पो.नि. रविंद्र गायकवाड, पो. ना. शेख आसेफ,शेख अन्वर सह पूर्ण सायबर टीमने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »