दिंद्रुड-आडस रस्ता चांगला असता तर ‘ती’ घटना टळली असती?
लोकगर्जनान्यूज
माजलगाव : कान्नापूर मोहा येथे छोटा हत्ती व एकजण नदीला आलेल्या पूरामध्ये वाहून गल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी ( दि. १४ ) दुपारी घडली आहे. दिंद्रुड-आडस रस्ता खराब असल्यामुळे हे व्यापारी सिरसाळा-मोहा-चिचखंड्डी-येल्डा असा वळसा घालून अंबाजोगाई येथे चालले होते. जर दिंद्रुड-आडस रस्ता चांगला असतातर हे सरळ याच मार्गे गेले असते व दुर्दैवी घटना कदाचित टळली असती अशी चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती आतातरी होईल का? आणखी बळी जाण्याची यंत्रणा वाट पहाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दिंद्रुड येथील रईस आतार ( वय ३५ वर्ष ) हे एका मालवाहतूक रिक्षाने ( छोटा हत्ती ) अंबाजोगाई येथे काही सहकार्यां सोबत खरेदीसाठी चालले होते. दरम्यान ते कान्नापूर मोहा येथे आले असता शुक्रवारी जोरदार पावसामुळे गव्हाडा ओढ्याला पूर आला होता. या पूराच्या पाण्याचं अंदाज आला नसेल अथवा वाहन निघेल असा चालकाला फाजील आत्मविश्वास असेल त्याने पाण्यात वाहन घातलं ते वाहून गेला. यात तिघे होते त्यातील दोघे सुखरुप बाहेर आले. रईस आतार हे वाहून गेले. प्रयत्नांची पराकाष्ठा नंतर शनिवारी ( दि. १५ ) रईस यांचा बंधाऱ्यात गाळात फसलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. ही दुर्दैवी घटना समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. परंतु ही घटनाच टळली असती अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे. याला कारण ही तसेच आहे.दिंद्रुड-आडस-अंबाजोगाई असा हा सरळ आणि जवळचा मार्ग आहे. परंतु दिंद्रुड ते आडस रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या मार्गाची झालेली आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही. विशेष म्हणजे याच रस्त्यावर माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे मोहखेड गाव आहे. पुढे आले तर सोळंके यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले रमेश आडसकर यांचे आडस हे गाव आहे.तरी या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. या खराब रस्त्यामुळे दिंद्रुड येथील व्यापारी सिरसाळा,कान्नापूर मोहा,चिचखंड्डी,येल्डा असा वळसा घालून अंबाजोगाई येथे चालले होते. अन् ती दुर्घटना घडली. दिंद्रुड-आडस रस्ता चांगला असतातर हा वळसा न घालता ते आडस मार्गे अंबाजोगाईला गेले असते अन् ही घटनाच टळली असती अशी चर्चा आहे.