दारुच्या नशेत पायऱ्यांवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू ; केज तालुक्यातील घटना
लोकगर्जनान्यूज
केज : खूप दारु पिल्याने पायऱ्या चढताना पडल्याने डोक्याला मार लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आडस ( ता. केज ) येथे सोमवारी ( दि. २ ) रात्री ९:३० च्या सुमारास घडली आहे. आज मंगळवारी ( दि. ३ ) दुपारी अंत्यविधी करण्यात आला.
दिपक उत्तम काळे ( वय ३० वर्ष ) रा. आडस ( ता. केज ) असे मयत तरुणाचे नाव आहे. दिपक हा येथील श्वेता बिअर बार येथे वेटर होता. सोमवारी ( दि. २ ) महात्मा गांधींच्या जयंती निमित्त दारुची सर्व दुकाने बंद असल्याने सर्वच वेटरांना सुट्टी होती. त्यामुळे दिपकने भरपूर दारु पिली होती. तो बिअर बारवरच झोपत असल्याने तो दारुच्या नशेत तिकडे झोपण्यासाठी गेला होता. तो इतका नशेत होता की, त्याला तोलही सांभाळत येत नव्हता. या अवस्थेत पायऱ्या चढत असताना तोल जाऊन तो जोरात खाली पडल्याने डोक्याला मार लागल्याने तो घटनास्थळी निपचित पडला. त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने हा प्रकार लवकर लक्षात आला नाही. रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास कोणीतरी पडल्याचे दिसून आल्याने तो काहीच हालचाल करत नाही हे पाहून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सपोनि विजय आटोळे व आडस चौकीचे पो.ह. प्रशांत मस्के, पो.ना. डी.वाय.मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला. आज सकाळी शवविच्छेदन करुन अंत्यविधी दुपारी १ वाजता करण्यात आला. तर रात्रीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचेही पोलीसांनी माहिती दिली. याप्रकरणी अद्याप फिर्याद न आल्याने पोलिसांत कसल्याही प्रकारची नोंद झालेली नाही.