दहशत लंपीची! केज तालुक्यातील या एकाच गावात १३ दिवसात लंपीने तीन जनावरे दगावली

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे लंपी संसर्गाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आज शनिवारी ( दि. ३ ) एका दुभत्या गाईचा लंपीमुळे मृत्यू झाला. या १३ दिवसातील लंपीने हा तिसरा बळी घेतला असल्याने शेतकऱ्यांमध्ये लंपीची दहशत निर्माण झाली आहे. परंतु सध्या ८ ते १० लंपी बाधित ॲक्टिव्ह रुग्ण असल्याने दिलासादायक चित्र आहे.
लंपी संसर्गामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. याला रोखण्यासाठी शासन व पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करत आहे. परंतु ही साथ रोखण्यात अद्याप यश आलेले नाही. आडस ( ता. केज ) येथे आतापर्यंत एकूण २०३ बाधित जनावरे आढळून आली आहेत. यातील चार जनावरे दगावली आहेत. यापुर्वी जवळपास दिड महिन्यांपूर्वी खडके यांचा बैल दगावला होता. यानंतर लंपी बाधित जनावरांची संख्या झपाट्याने वाढली. गेल्या महिन्यात ९ नोव्हेंबर ओमकार मेनकुदळे यांची एक दुभती गाय लंपी बाधित आढळून आली. तीच्यावर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मसने यांनी उपचार सुरू केले. परंतु ११ दिवस उपचार करुनही २० नोव्हेंबर त्या गायीचा मृत्यू झाला. याच दिवशी दुसरी गायही बाधित असल्याचे निष्पन्न झाले यानंतर हा शेतकरी हादरुन गेला. जी भीती होती ती आज खरी ठरली तेरा दिवस उपचार केले हजारो रुपये खर्च व्यर्थ झाले. आज शनिवारी ( दि. ३ ) दुसऱ्या गायीचा सकाळी ११ वाजता लंपीने घास केला. १३ दिवसात दुभत्या गायी दगावल्याने या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनास्थळी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. शुक्रवारी ( दि. २ ) धारुर रस्त्यावरील चव्हाण या शेतकऱ्याचे वासरू लंपीने दगावले आहे. अशा प्रकारे १३ दिवसात ३ जनावरे दगावली असल्याने शेतकऱ्यांमध्ये लंपीची दहशत निर्माण झाली आहे. परंतु घाबरून न जाता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घ्यावी, गोठा व परिसर स्वच्छ ठेवा, आजारी जनावरे कॉरंटाईन करा, चरण्यासाठी सोडू नका असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दत्ता मसने यांनी केले.
ॲक्टिव्ह रुग्ण ८ ते १०
आडस परिसरात मोठ्या प्रमाणात लंपी संसर्गाची जनावरांना लागण होत आहे. यामुळे ऑक्टोबर -नोव्हेंबर या दोन महिन्यांत लंपीने येथे अक्षरशः धुमाकूळ घातला. परंतु सध्या केवळ ८ ते १० बाधित जनावरे ॲक्टिव्ह आहेत. यामुळे साथ आटोक्यात येत असल्याचे दिसून येत असून ही समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
पाच दिवसात लंपी बाधित जनावर बरा होतो? हा दावा खरा की,खोटा?
लंपी बाधित जनावरांना योग्य उपचार मिळाले तर ती जनावरे तीन ते पाच दिवसात बरे होतात. असा दावा केला जातो. परंतु ओमकार मेनकुदळे यांच्या दोन्ही गायीवर ११ व १३ दिवस उपचार करण्यात आले. आवश्यक असलेली काही औषधे बाहेरुन विकत आणून दिले. पण तरीही दोन्ही गायी दगावल्याने हा दावा खरा की,खोटा? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.