थरारक घटना! धावत्या कारने घेतला पेट एकाचा होरपळून मृत्यू
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : धावत्या कारने अचानक पेट घेऊन आतील एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची थरारक घटना अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बर्दापूर जवळ बुधवारी रात्री घडली आहे. यातील मयताची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. बर्दापूर पोलीस तपास करत आहेत.
अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी ( दि. २० ) रात्री कार क्र. MH 08 R 7879 या धावत्या कारने अचानक बर्दापूर ( अंबाजोगाई ) पाचपीर दर्गा जवळ अचानक पेट घेतला. या आगीत आतील एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अग्निशमन बंब बोलावून आग विझविण्यात आली. सदरील जळालेली कार लातूर येथील असल्याचे वृत्त असून आतील मयत व्यक्तीची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. तसेच ही आग नेमकी कशी लागली व आतमध्ये किती प्रवासी होते? याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेचा तपास पोलीस करत असून यानंतरच या थरारक घटनेचा खूलासा होईल.