थरारक! कोयत्याने वार करुन अल्पवयीन मुलाची हत्या; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
लोकगर्जनान्यूज
वडवणी : अंधाराचा फायदा घेऊन १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करुन हत्या केल्याची थरारक घटना तालुक्यातील पिंपरखेड येथे बुधवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी हल्ला करणारा संशयित आरोपी नात्याने चुलता असून त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्येमागील कारण अद्याप समोर आले नसून कौटुंबिक वादातून हत्या केल्याची चर्चा आहे.
सुरज श्रीकृष्ण शिंदे ( वय १६ वर्ष ) रा. पिंपरखेड ( ता. वडवणी ) असे मयत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. बुधवारी तो रस्तावर उभा असताना अचानक वीजपुरवठा बंद झाला. अंधार होताच चुलत्याने सुरजच्या पाठीमागून कोयत्याने सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्याने घाबरून जोरात ओरडला असता गावातील काहीजण धावत आले. जवळ येऊन पाहिलं असता सुरज शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यास तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. हल्ला करणाऱ्याने स्वतः कोणाला तरी फोन करुन मीच सुरजला मारल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धाव घेतली व संशयिताचा शोध सुरू केला. सकाळी देवडी परिसरातून संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले. आरोपी मयताचा नात्याने पुतण्या असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अल्पवयीन मुलाला चुलत्याने का मारलं? याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. बातमी लिहपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.