थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालाय ‘नो प्रॉब्लेम’
विलासराव देशमुख अभय योजनेतून पुन्हा घरा-घरात प्रकाश येणार
लोकगर्जना न्यूज
थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करुन मीटर काढून नेले आहे. अशा ग्राहकांच्या घरात, अथवा व्यवसायिकांसाठी उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा केली. यामध्ये ग्राहकांना अनेक सवलती देण्यात येणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या महावितरण कंपनी कार्यालयात अथवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन कनिष्ठ अभियंता महावितरण रवि शिंदे यांनी केले आहे.
राज्यभरात कायम स्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची संख्या ३२ लाख १६ हजार ५०० इतकी असून त्यांच्याकडे व्याज व दंड असे मिळून ९,२६१ कोटी थकबाकी आहे. यातील मुळ ६,२६१ कोटी थकबाकी आहे. या ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी करता यावी, त्यांच्या घरी प्रकाश यावा तसेच व्यावसायिकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा केली. यामध्ये कृषी वीज ग्राहक वगळता सर्वांना लाभ घेता येणार आहे. या योजनेतून थकबाकी धारकांसाठी मोठी सवलत दिली जाणार आहे. सदरील योजना १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ असे सहा महिने राबविण्यात येणार आहे. लाभ घेण्यासाठी ग्राहकाने यासाठी महावितरण कंपनीच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. विलासराव देशमुख अभय योजनेत ग्राहकाने एक रकमी थकबाकी भरली तर त्या ग्रहाकास दंड व व्याजामध्ये शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच या योजनेत सुलभ हप्त्यात रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील ३२ लाख पेक्षा जास्त ग्रहाकांना वीज जोडणी मिळणार आहे. याची अधिक माहिती व योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरण कार्यालयात अथवा आपल्या गावातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरण कंपनी कनिष्ठ अभियंता,आडस रवि शिंदे यांनी केले आहे.
आडसच्या एका ग्रहाकाने केली नोंदणी
विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी आडस ( ता. केज ) येथील रन्नुसिंग हिरासिंग पवार यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यांचा अर्ज प्रोसेस मध्ये असून मंजुरी मिळताच त्यांची थकबाकी भरून घेऊन पुन्हा वीज जोडणी देण्यात येणार आहे.
रवि शिंदे
कनिष्ठ अभियंता, महावितरण कंपनी, आडस
शेतकऱ्यांसाठी आवाहन
शेतकऱ्यांसाठी कृषी पंप वीजबिल सवलत योजना २०२० याचीही वीजबिल भरण्याची मुद्दत ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे. यातही शेतकऱ्यांना ५० ते ६६ टक्के सवलत देण्यात येते. शेतकऱ्यांनी आपल्या कृषी पंपाचे वीजबिल भरुन लाभ घ्यावा व थकबाकी मुक्त व्हावे तसेच महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन ही करण्यात आले.