‘त्या’ शिक्षकाच्या आत्महत्येमागील धक्कादायक कारण आले समोर; दोघांवर गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील आसरडोह येथे मंगळवारी ( दि. १४ ) सकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. श्री मंगलनाथ मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. माजलगावच्या वसुली पथकाच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं असून मयत शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून सदरील मल्टिस्टेटच्या वसुली पथकाच्या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बोडखा ( ता. धारुर ) येथील जिल्हा परिषद शाळेवर मयत नितीन लक्ष्मण पाटोळे ( वय ३४ वर्ष ) रा. आसरडोह ( ता. धारुर ) हे कार्यरत होते. त्यांनी माजलगाव येथील श्री. मंगलनाथ मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. माजलगाव कडून कर्ज घेतले होते. त्याचे काही हप्ते थकले होते. यासाठी सदरील मल्टिस्टेटच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावला होता. नेहमीच वसुलीसाठी त्रास देण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून शिक्षक नितीन पाटोळे यांनी मंगळवारी ( दि. १४ ) सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास गावाच्या पुर्वेस देशमुख यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या आशयाची फिर्याद मयताची पत्नी मंगल नितीन पाटोळे ( वय ३० वर्ष ) रा.आसरडोह ( ता. धारुर ) यांनी दिली. त्यावरुन धारुर पोलीस ठाण्यात आरोपी रविंद्र रामेश्वर काटकर, प्रशांत सोळंके मंगलनाथ मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजगाव यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव हे करत आहेत.