‘त्या’ तरुणाच्या मृत्यूबाबत नातेवाईकांना घातपाताचा संशय
दोन दिवसांपासून होता बेपत्ता;आज आढळला मृतावस्थेत
लोकगर्जनान्यूज
केज : अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील २७ वर्षीय तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. आज गुरुवारी ( दि. ९ ) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्याचा केज-कळंब रस्त्यावर मांजरा नदीच्या पात्रात पाण्यात तरंगत असलेला मृतदेह आढळून आला. याबाबत नातेवाईकांनी ओळख पटवून तो पवन रामराव गोचडे असल्याचे सांगितले तर, मृत्यू बद्दल घातपाताचा संशय व्यक्त केला.
पवन रामराव गोचडे ( वय २७ वर्ष ) रा. चनई ( ता. अंबाजोगाई ) हा बेपत्ता असल्याचे तक्रार अंबाजोगाई पोलीसांना दिली होती. बुधवारी ( दि. ८ ) याच मांजरा नदीच्या पुलाजवळ मयत युवकाचा रिक्षा बेवारस स्थितीत आढळून आला. त्यामुळे पोलिसांना याची शंका होती. अखेर ती आज खरी ठरली. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पुलाजवळ पाण्यावर तरंगत असलेला एक मृतदेह मासेमारी करणाऱ्यांना आढळून आला. याची माहिती त्यांनी कळंब पोलीसांना दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पिंगनवाड, पोलीस नाईक कोळेकर, पोलीस नाईक गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून अंबाजोगाई पोलीसांना कळविले. यानंतर मयताची ओळख पटविण्यासाठी चनई येथील नातेवाईक आले त्यांनी मृतदेहाची ओळखून पवन गोचडे असल्याचे सांगितले. पोलीसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंब येथील सरकारी दवाखान्यात हलविले. या प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला.