तिहेरी अपघातात एक ठार;तीन जखमी
दिंद्रुड : भरधाव वेगात असलेल्या अज्ञात कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने घडलेल्या तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू झाला तर, तिघे जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास दिंद्रुड-मोहखेड रस्त्यावर घडली आहे. धडक दिलेल्या कार चालकाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दुचाकीस्वारांना मदत करण्या ऐवजी पळून गेल्याचे सांगितले जात आहे.
भानुदास बालासाहेब पांचाळ (वय २६) , गोरक्षनाथ भाऊसाहेब पांचाळ (वय ५०) हे दोघे ( रा. हिंगणी ता. धारुर ) रविवारी रात्री ८ च्या सुमारास दुचाकीवर दिंद्रुड येथून हिंगणीकडे चालले होते. तर, बब्रुवान ज्ञानोबा दीक्षित (वय ४०, रा. उम्बराई, माजलगाव) आणि आकाश गुंडीबा सोनवणे (वय २७, रा. कासारी, ता. धारूर) हे ही त्याचवेळी दुचाकीवरून डबलसिट जात होते. दरम्यान एका अज्ञात भरधाव कारने दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली. त्यामुळे दोन्ही दुचाकी वरील चारही जण खाली कोसळले मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. यातील भानुदास पांचाळ यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयाकडे हलवण्यात आले. बीडच्या डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.