तरूणाईच्या वाटा
भारत हा कृषीप्रधान देश आहे. पूर्वीच्या काळी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. बारा बलुतेदारी पद्धत असल्यामुळे गावगाडा, गावकी असे गावाच्या कारभाराविषयीचे बरेचसे शब्द प्रचलित होते. इ.स. 1916 साली गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून महात्मा गांधी यांनी भारत यात्रा आरंभ केली. ‘खेड्याकडे चला’ ही घोषणा बापूंनी दिली. खरा भारत हा ग्रामीण भागातच आहे असे महात्मा गांधीजींचे मत होते.
2017 साली ‘महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन’ अभियानाची सुरुवात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली. या अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यातील काही निवडक गावात मुख्यमंत्रीदूत म्हणून दादासाहेब गायकवाड, वैजनाथ इंगोले, प्रमोद जाधव, दीपक पवळ, अशोक हातागळे, दत्तात्रय शिंगाडे या युवकांची निवड झाली. तीन वर्षाच्या फेलोशिप काळात या टीमने त्यांना नेमून दिलेल्या गावात अतिशय उत्कृष्ट कार्य केले. कार्यकाळ संपत असताना या सर्व युवकांनी आपण कायम ग्रामीण भागातील युवकांसाठी, गावाच्या विकासासाठी, शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांच्या विकासासाठी काहीतरी कार्य करावे हा निश्चय केला. याच टीमने गावाच्या विकासासाठी ‘ग्रामसुधार कार्यक्रम’ हाती घेत मार्च 2019 मध्ये ‘ग्रामऊर्जा फाउंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली.
या संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांचा वेगवेगळ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांसोबतच्या कामाचा अनुभव असल्यामुळे संस्थेची बांधणी आणि आराखडा हा उत्तमरित्या बनविला गेला. सहकारी वैजनाथ इंगोले, अशोक हातागळे यांना असलेला सामाजिक कार्याचा अनुभव तसेच प्रमोद जोशी, प्रमोद जाधव, अभिषेक राखेचा, दीपक पवळ यांचा असलेला विविधांगी अनुभव संस्थेच्या पायाभरणीसाठी महत्त्वाचा ठरला. या सर्व संचालक मंडळाला बीड जिल्ह्यातील ग्रामपातळीवरील सामाजिक प्रश्नांची जाणीव असल्याने गावाचा विकास आराखडा तयार करून शिक्षणावर काम करणे, रोजगारासंबंधी संधी, महिलांचे सक्षमीकरण तसेच शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे इत्यादी कार्यक्रमाची आखणी करणे सोपे गेले. आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर दादासाहेब गायकवाड आणि सहकार्यांनी मिळून अल्पावधीतच ग्राम ऊर्जा फाउंडेशनचे कार्य आणि नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचविले. यासाठी त्यांनी अनेक सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य घेतले. देश-विदेशातील अनेक बड्या कंपन्या, संस्था सामाजिक कार्य करण्यासाठी तयार असतात परंतु त्यांचं कार्य तळागाळापर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही हे ओळखून ग्रामऊर्जा फाऊंडेशनने या संस्थांकडून मदत घेऊन आजवर शिक्षण आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अनेक कामे केलेली आहेत.
ग्राम ऊर्जा फाउंडेशनने आपले पाय रोवल्यानंतरच्या काळात संपूर्ण देशात covid-19 ची लाट आली, या काळात फाऊंडेशनच्या प्रत्येक सदस्याने सर्वसामान्यांना मदत मिळवून देण्यासाठी जीवतोड मेहनत केली. या संस्थेने केलेली काही निवडक कामे खालील प्रमाणे आहेत.
■ कोव्हीड १९ काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या संस्थेने बीड जिल्ह्यातील ३० गावात मानधन तत्वावर स्वयंसेवकांची नेमणूक केली. या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन निरंतर शिक्षण प्रक्रिया कार्यक्रम राबविला. सर्व कोरोनाविषयक नियमांचे पालन करत या उपक्रमांचा लाभ ३८०० विद्यार्थ्यांनी घेतला आहे. सदर उपक्रमाची दखल ‘कतार’ देशातील ‘एज्युकेशन अबाव्ह ऑल’ या संस्थेने घेतली व आर्थिक साहाय्याबरोबरच उपक्रमाधारित शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
■ कोव्हीडच्या सुरुवातीच्या काळात मास्कचा तुटवडा होता हे लक्षात घेऊन ‘अरविंद’ या गुजरात मधील कंपनीची मदत घेत ग्रामऊर्जाने १५०००० मास्कचेच वाटप आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांना केले, तसेच आंबेजोगाई आणि ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये पी. पी.ई.कीटचे वाटप केले.
■ कोविड १९च्या दुसऱ्या लाटेदरम्यान बीड जिल्ह्यामध्ये अनेक रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. या परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांना ऑक्सिजन चा बेड मिळणे कठीण झाले होते. अशा कालावधीत ग्रामउर्जा फाउंडेशन ने विभा, सेवा इंटरनॅशनल, स्वस्ती या संस्थांच्या सहकार्याने गरजू रुग्णांसाठी ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चा उपयोग १०० पेक्षा जास्त रुग्णांना झाला.
■ ज्या काळात लोक घरात बसून होते, रोजगार नव्हता त्या कालावधीत ग्रामऊर्जा फाउंडेशनने ‘टेक महिंद्रा’, रिलायन्स फाउंडेशन आणि ‘अजीम प्रेमजी फाउंडेशन’ या संस्थांच्या सहकार्याने १८५० कुटुंबांना राशन किटचे वाटप केले.
■ या काळात शाळा पूर्णपणे बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या स्व-अध्यायामध्ये खंड पडत चालला होता. यासाठी ‘ई.विद्यालोका’ या संस्थेच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग आणि स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. या स्वाध्याय पुस्तिकांच्या मदतीने विद्यार्थी गणित आणि भाषेचा सराव घरबसल्या करू शकले.
■ विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकता यावी यासाठी ‘लेट्स टिच इंग्लिश’ या संस्थेकडून मदत घेत 30 विद्यार्थ्यांना ‘मेंटॉर’ देण्यात आले. या ‘मेंटॉर’ च्या साहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी मदत झाली.
■ ग्रामऊर्जाचे कार्य केवळ कोव्हीड कालावधीपुरते राहता सामाजिक जाणिवांचा विचार करून कार्य पुढे जावू लागले. ग्रामीण भागातील युवक हे पोलीस भरती सैनिक भरती वनरक्षक भरतीसाठी अतोनात कष्ट घेतात. गरीब घरातील या युवकांना या मेहनतीसाठी चांगल्या दर्जाचे बूट घेणे शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन संस्थेने अशा २५०० युवकांना ‘कॅम्पस कंपनीचे’ दर्जेदार बूट मोफत उपलब्ध करून दिले.
■ फूटपाथवर राहणाऱ्या अनाथ, गरीब लोकांना अंगभर कपडे नाहीत हे ओळखून ‘रॉयल इनफिल्ड’ व ‘क्लॉथबॉक्स’ या दोन कंपन्यांच्या सहकार्याने अशा ५०० गरजू लोकांना टिशर्ट व शर्ट चे वाटप ग्रामऊर्जा फाउंडेशन केले आहे.
■ दिव्यांग व्यक्तींना देखील गावामध्ये मुक्त संचार करता यावा या उद्देशाने आजवर चार अपंग व्यक्तींना इलेक्ट्रिक व्हीलचेअर चे वाटप करण्यात आले आहे.
■ शैक्षणिक कार्य करत असताना विद्यार्थ्यांसाठी फिरते वाचनालय असावे ही संकल्पना संस्थेच्या सदस्यांच्या डोक्यात आली आणि यामधून प्रथम बुक संस्थेच्या सहकार्याने १५ गावांमध्ये फिरते वाचनालय सुरू करण्यात आले. यामधील पुस्तके विद्यार्थ्यांच्या वाचन स्तरानुसार ठेवण्यात आली आहेत.
■ विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी ‘इकोचॅम्प’ या संस्थेच्या सहकार्याने पर्यावरणासंबंधी मार्गदर्शन सत्र राबविण्यात आले.
■कोल्हापूर, चिपळूण येथे महापूर आला होता तेव्हा पाटण येथील १८० कुटुंबांना ज्ञानप्रबोधिनी या संस्थेच्या सहकार्याने ताडपत्रीचे वाटप संस्थेने केले आहे.
अल्पावधीतच ग्राम ऊर्जा फाउंडेशनने आपल्या कार्याचा आलेख उंचावला आहे. एकीकडे भलत्यासलत्या विषयाकडे वळणारी तरुणाई आणि दुसरीकडे ग्राम ऊर्जा फाउंडेशनमध्ये काम करत असलेला हा युवक वर्ग यांच्यात खूप मोठी तफावत आहे. आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो ही जाणीव या युवकांमध्ये आहे म्हणून सामाजिक कार्यात ते आपला ठसा उमटवित आहेत. भविष्यात या उपक्रमात तरुणांची फळी उभा करणे तसेच ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, शाळांची व गावाची स्थिती सुधारणे, शिक्षणाबरोबरच रोजगार, आरोग्य, सुशासन यावर कामे करणे, लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ,महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी कंपनी यांच्यासोबत काम करणे इत्यादी उपक्रम संस्था राबविणार आहे. प्रशासनाच्या सोबतीने तसेच ‘टिच फॉर इंडिया’ या जागतिक दर्जाच्या संस्थेच्या मदतीने ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘ग्रामउर्जा फाउंडेशन फेलोशिप प्रोग्राम’ सुरु करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून युवकांनी सुरू केलेली ही ग्राम सुधारणेची चळवळ इतर युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. तळागाळातील लोकांपर्यंत या संस्थेचे कार्य पोहोचावं व स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी ग्रामउर्जा फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा!
शब्दांकन – सिद्धेश्वर इंगोले
९५६१२०४६९१