तरुणाची गळफास लावून आत्महत्या;केज तालुक्यातील घटना
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. ही बातमी गावात पसरताच एकच खळबळ उडाली व घटनास्थळी मोठी लोकांनी गर्दी केली.
राजकुमार गणेश शिंदे ( २५ वर्ष ) रा. आडस ( ता. केज ) असे मयताचे नाव आहे. राजकुमार हा सोमवारी फार्मसिस्टचा पेपर देण्यासाठी जळगाव येथे गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. परत आला की, नाही म्हणून आईने चौकशीसाठी फोन केला असता गुरुवारी त्यांने फोन उचलला नाही. गणेश शिंदे यांचे गावात रहाते घर असून महाराणा प्रताप चौकात एक घर आहे. कधीकधी तो तिथे थांबतो म्हणून शुक्रवारी ( दि. २९ ) रात्री ८ च्या सुमारास तिथे जाऊन पाहिले असता गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. समोर लटकलेल्या अवस्थेत पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला आवाज ऐकून शेजारी धावत आले. घटनेची माहिती दिल्यानंतर आडस चौकीचे पोलीस कर्मचारी प्रशांत मस्के, प्रकाश सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात नेण्यात आला. आज सकाळी त्याचे शवविच्छेदन होईल. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे. आई-वडीलांनी कबाडकष्ट करुन मुलाला बी फार्मसी पर्यंत शिक्षण दिले. ऐन तारुण्यात मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.