ठोस कारवाई झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही ; नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा अवैध वाळू वाहतूक अपघात प्रकरण
गेवराई : तालुक्यातील खामगाव येथील एकास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले असून यामध्ये एका निष्पापचा बळी गेला. सदरील मृतदेह गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मयताच्या नातेवाईकांनी दोषींवर जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
गेवराई तालुक्यात अवैध वाळू वाहतूकीचा बेसुमार उपसा सुरू आहे. याचा या भागातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. अनेक वेळा मागणी करुनही याकडे कोणाचेही लक्ष नसून आज याच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने खामगाव येथील तुकाराम बाबुराव निंबाळकर यांना राक्षसभुवन फाटा राष्ट्रीय महामार्ग 52 येथे चिरडले असून तुकाराम यांचा मृत्यू झाला. यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. मृतदेह गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलेला असून जोपर्यंत यामधील दोषींवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. काही वेळा पुर्वी पर्यंत ही मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. रुग्णालयात परिसरात मोठी गर्दी जमलेली असून तणावाचे वातावरण आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.