ठाकरे गट शिवसेनेकडून नवीन जिल्हाप्रमुखाची निवड

लोकगर्जनान्यूज
बीड : येथील महाप्रबोधन यात्रेच्या तोंडावर गटबाजी उफाळून येऊन ही हातापायी पर्यंत मजल गेली. स्वतः जिल्हा प्रमुखाने व्हिडिओ व्हायरल करुन महिला नेत्याला दोन लगावल्याची कबुली दिली. याची दखल घेऊन पक्षप्रमुखांनी जिल्हा संपर्कप्रमुख व संबंधित जिल्हाप्रमुख यांची हकालपट्टी केली. या रिक्त जागेवर केज तालुका प्रमुख असलेले रत्नाकर शिंदे यांना बढती देत जिल्हाप्रमुखाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली.
जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी केल्यानंतर या रिक्त जागेवर जिल्हाप्रमुख म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. रत्नाकर शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. तसेच घडले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून गेल्या अनेक वर्षांपासून केज तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे रत्नाकर शिंदे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड केली. यांचे कार्यक्षेत्र केज, अंबाजोगाई,परळी, धारुर, माजलगाव, वडवणी हे सहा तालुके रहाणार आहेत. रत्नाकर शिंदे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याची बातमी समजताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.