जिल्ह्याचा विकास खरंच हवाय तर एमआयडीसी ( MIDC ) उभी न करता उद्योग आणणं आवश्यक
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात आज सहा ठिकाणी औद्योगिक वसाहती ( MIDC ) आहेत. यातील काही अपवाद वगळता उद्योग नाहीत. त्यामुळे एक प्रकारे याला थडगे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुढाऱ्यांनी या थडग्याचे गाजर न दाखवता बीड जिल्ह्यासाठी मोठे उद्योग आणावेत एमआयडीसी होत राहील. परंतु यांची नियत चांगली नसल्याचे अनेक वर्ष झाली जिल्ह्यातील काही एमआयडीसी विणा उद्योगाच्या उभ्या असल्याने दिसून येत आहे. यामुळे प्रकाश दादा वडवणी येथे एमआयडीसी MIDC ऐवजी मोठा उद्योग आणला असता तर एमआयडीसीही झाली असती आणि तरुणांच्या हाताला काम मिळाले असतेतर तुम्हाला आर्शिवाद मिळाले असते.
बीड जिल्हा हा राज्यातील सर्वात मागास, ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. आता राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून काळा डाग लागला. या जिल्ह्यातील जनतेचे उत्पन्नाचे साधन म्हणजे कोरड वाहू शेती अन् ऊसतोडणी हेच आहेत. सुशिक्षित मुलं शिक्षण घेऊन ऊसतोडीला फाटा देऊन इतर कामं करायचे असेल तर जिल्ह्यातील तरुणांना पुणे, मुंबई, औरंगाबाद, लातूर, नागपूर आदी भागात जावं लागतं. विशेष म्हणजे जिल्हाभरात सध्या बीड, परळी, माजलगाव,आष्टी, धारुर, सिरसाळा या सहा ठिकाणी एमआयडीसी MIDC आहेत. तर केज येथे काही महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली असून त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. तर कालच वडवणी तेथेही एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे. वरील सहा ठिकाणच्या एमआयडीसी MIDC भागात किती उद्योग आहेत हा संशोधनाचा भाग आहे. सहा ठिकाणी एमआयडीसी असेलतर जिल्ह्यातील तरुणांना हाताला काम मिळावे म्हणून जन्मभूमी, माय,बाप सोडून बाहेर जावं लागतं असेलतर या एमआयडीसी यांच्यासाठी थडगेच ठरत आहेत. यामुळे पुढाऱ्यांनी एमआयडीसी मंजूर करुन त्याच्या सुविधांसाठी निधी खर्चून गुत्तेदार च्या माध्यमातून घरं भरुन लोकांना रोजगाराचे गाजर दाखवतात. पण खरंच तुम्हाला बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर तुम्ही राजकीय शक्ती, बुध्दी चातुर्य वापरून मोठे उद्योग आणावेत. मोठे उद्योग आणल्यानंतर एमआयडीसी MIDC सहज उभी होईल अन् जिल्ह्याच्या तरुणाला रोजगार मिळविण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नसल्याची चर्चा तरुणांमधून करण्यात येत आहे.
दादा माजलगावात एखादा उद्योग आणला असता तर गरीबांचे आर्शिवाद लागले असते
माजलगाव येथे २०१४ ला एमआयडीसी MIDC झाली. येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. परंतू मुख्य उद्योग किती आहेत. १० वर्ष ही जागा पडून असून तुम्ही प्रयत्न करुन एकच मोठा उद्योग आणला असता तर वडवणीच काय तर सिरसाळा आणि बीडच्याही एमआयडीसी मध्ये उद्योग सुरू झाले असते. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळून त्यांची चुल पेटली असती तर नक्कीच तुम्हाला आर्शिवाद मिळाले असते.
दुष्काळी जिल्हा पण साखर कारखान्यांना ऊत तर सिताफळ प्रक्रिया उद्योग दुर्लक्षित
बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दुष्काळी जिल्ह्यात जवळपास प्रत्येक तालुक्यात एक साखर कारखाना आहे. तर काही तालुक्यात दोन-दोन साखर कारखाने दिसतील. परंतु दुष्काळी, डोंगर भागात हलक्या जमीनीवर येणारे सिताफळ पीक, या रानमेव्याची बीड जिल्ह्याला निसर्गाची मोठी देण आहे. धारुर हे वाण सिताफळातील ब्रॅण्ड आहे. परंतु यावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नाही. याकडे कधी साखर सम्राटांचे लक्षच गेले नाही की, जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात येतो.
रेशीम कोष प्रक्रिया उद्योगासाठी कोण पुढाकार घेणार?
रेशीम कोष उत्पादनात बीड जिल्हा एक नंबरवर असून, येथे दर्जेदार रेशीम कोष निर्मिती होते. परंतु कोष बनवून ते विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आगोदर तर कर्नाटक राज्यात कोष विकण्यासाठी जावे लागत असे पण बीड येथे खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. परंतु याऐवजी रेशीम वर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू झाले तर तरूणांच्या हाताला काम मिळेल आणि शेतकऱ्यांनाही दोन रुपये जास्त मिळतील. पण यासाठी पुढे कोण येणार? हा प्रश्न आहे.