जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळेंचे निलंबन म्हणजे गधे खाय गुलगुले औरे घोडा….?
लोकगर्जनान्यूज
बीड : लोखंडी सावरगाव पदभरती प्रकरणी राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी बीडचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली. परंतु या पदभरती आणि डॉ. साबळेंचा काहीच संबंध नसताना या जागा नाशिकच्या एका कंपनीला कंत्राट पध्दतीने भरण्यासाठी दिल्या आहेत. मग साबळेंचा बळी का? असा प्रश्न उपस्थित करत हे निलंबन म्हणजे वाह..रे… सरकार तेरा खेल गधे खाये गुलगुले औरे घोडा खाये दंडे असा असल्याची भावना जनसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.
लोखंडी सावरगाव ( ता. अंबाजोगाई ) येथील मानसिक उपचार केंद्र या इमारतीत स्त्री रुग्णालय व वृध्द उपचार केंद्र सुरू करण्यात आले. यामुळे येथे कंत्राटी पद्धतीने अनेक पदे भरण्यात आली. ही सर्व पदे नाशिकच्या कंपनीला कंत्राट दिले. परंतु यामध्ये काही पुढाऱ्यांनी ढवळाढवळ करून भरतीमध्ये गैरव्यवहार केल्याची ओरड झाली. हा प्रश्न आ. पडळकर यांनी विधानपरिषदेत मांडला. याची दखल घेत आरोग्य मंत्री तानाची सावंत यांनी याप्रकरणी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली. याबाबत बीड जिल्ह्यात ही माहिती पसरताच जनसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भरती अन् जिल्हा शल्यचिकित्सक यांचा संबंध नसताना एका चांगल्या अधिकाऱ्याचा बळी का घेतला जातोय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भरतीमध्ये गैर प्रकार घडला असेल तर याची चौकशी करुन सरकारने नेमलेल्या त्या कंपनीवर कारवाई होणे अपेक्षित असताना डॉ. साबळेंचा बळी का? असे प्रश्न उपस्थित करत जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे.