जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर:बीड चे अध्यक्षपद कोणासाठी आरक्षित
लोकगर्जना न्यूज
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलून प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा सध्या थांबलेल्या असून, शुक्रवारी ( दि.३० ) राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. यामध्ये बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती ( एस.सी. ) साठी आरक्षित राहिले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूक शासनाने पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्रशासक नेमण्यात आले. यामुळे ग्रामीण भागात राजकीय चर्चा पुर्णपणे थांबली आहे. गट व गणाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी गाठीभेटी वाढविल्या होत्या परंतु निवडणूक पुढे ढकलण्यात आली असल्याने त्यांनीही गाठीभेटी कमी केल्या आहेत. राजकीय वातावरण थंड असताना शुक्रवारी (दि. ३० ) ग्रामविकास खात्याने अधिसूचना जारी करुन ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केले. बीड जिल्हा परिषदेसाठी अध्यक्षपद अनुसूचित जाती ( एस.सी ) साठी आरक्षित राहिले आहे. यामुळे अध्यक्ष कोण होणार? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एससी साठी राखीव असलेल्या जिल्हा परिषद गटांच्या निवडणूका चुरशीच्या ठरु शकतात. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.