जिरेनियम शेती ठरु शकते शेतकऱ्यांसाठी वरदान
धारुर तालुक्यातील आसरडोह येथील शेतकरी वसंत देशमुख यांचा अनोखा प्रयोग

लोकगर्जना न्यूज
मुबलक पाणी असतानाही दोन वर्षांपासून होत असलेल्या बेजारीला कंटाळून ऊस मोडून केळी, पपई नंतर आता आसरडोह ( ता. धारुर ) येथील प्रयोगशील शेतकरी वसंत देशमुख यांनी जिरेनियम लागवड व रोप तयार करण्याचा प्रयोग केला. लागवड सोडली तर कोणताही खर्च नसलेले हे पीक असल्याने जिरेनियम शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते असे मत वसंत देशमुख यांनी व्यक्त केले.
धारुर तालुक्यातील आसरडोह हे गाव वाण नदीच्या काठावर वसलेले आहे. त्यामुळे पाण्याची शेतीसाठी उपलब्धता असते. तसेच काही वर्षांपूर्वी याच नदीवर मोरफळी साठवण तलाव हा प्रकल्प झाल्याने शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. ऊस म्हणजे बागायतदार शेतकऱ्याची ओळख मानली जाते. वसंत देशमुख यांनी आगोदर ऊस लागवड केली. परंतु त्यासाठी येणारा खर्च व मेहन आणि दोन वर्षांपासून ऊस घेऊन जा म्हणून कारखानदारांचे झिजवावे लागतं असलेले उंबरे पहाता ऊस मोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर एक एकर केळी लागवड केली यातून ३ लाखांचे भरघोस उत्पन्न मिळाले. परंतु यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं असल्याने केळीची बाग मोडली. गत वर्षी दीड एकरात पपईची लागवड केली. यातून दीड लाखांचे उत्पन्न मिळाले. परंतु यात फळं पिकल्याने नुकसान झाले म्हणून याकडे दुर्लक्ष केले. जिरेनियम शेतीचा अनोखा प्रयोग केला. जिरेनियम हे एका प्रकरचे गवत असून यातून सुगंधित तेल निघतो. हा तेल अनेक प्रकारच्या परफ्यूम मध्ये तसेच सुगंधित तेलात वापर केला जातो. याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे फवारणीची गरज नाही. हा पाला पाळीव अथवा वन्यप्राणी खात नाही. त्यामुळे याचे राखन करण्याची गरज नाही. एकदा याची लागवड केली की, सलग पाच वर्ष उत्पादन घेता येते, एका वर्षात तीन वेळा कापणी केली जाते. यातून शेतकऱ्याला वर्षात एकरी २ लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळते. यासाठी एक्करी १० हजार रोप लागतात. १ रोपाची किंमत ५ रु. असून हा आणि ठिबकचा खर्च वगळता कोणताही खर्च नाही. यासाठी जिरेनियम प्रकल्प असणारे बांधावर येऊन खरेदी करतात. जमिनीच्या बाबतीत म्हटले तर जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी असेही वसंत देशमुख यांनी सांगितले आहे. एकदा लागवड केली तर पाच वर्ष उत्पादन विना खर्च निघत असल्याने जिरेनियम शेती मराठवाड्यासाठी वरदान ठरु शकते! असे मत बोलताना व्यक्त केले.
रोपं विकत मिळतील आणि जुलै पासून जिरेनियम खरेदीही करणार
जिरेनियम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रोपं आम्ही देऊ, ज्यांना रोप हवे आहेत त्यांना ४० दिवस अगोदर ऑर्डर देणे आवश्यक आहे. तसेच जिरेनियमचे तेल काढण्याचा प्रकल्प प्रगती पथावर असून येत्या जुलै महिन्यांपासून प्रत्येक्ष खरेदी सुरू होईल.
वसंत देशमुख शेतकरी आसरडोह ता. धारुर