जावयाची गाढवावरून मिरवणूक:विडेकरांची रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू
सकाळीच मिळणार मानकरी जावयाची गुड न्यूज

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील विडा येथे धुळवडीला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे. यासाठी विडेकर जावयाच्या शोधात असतात. मंगळवारी ( दि. 7 ) जावयाची मिरवणूक काढण्यात येणार असल्याने सोमवारी ( दि. 6 ) रात्री उशिरापर्यंत विडेकर जावयाच्या शोधात होते. त्यामुळे यंदाचा मानकरी कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मंगळवारी सकाळीच मानकरी जावयाचे नाव समोर येणार आहे.
जावायी म्हटलं की, सासरवाडीत त्याचा रुबाब वेगळाच. त्याच रहाणं, खानपान जावायाच्या पाहूनचारात काही कमी रहु नये म्हणून सासरे, मेव्हणे प्रयत्न करतात. सर्व रुसवे फुगवे सांभाळून घेत जावयाची काळजी घेतात. परंतु केज तालुक्यातील विडा येथे धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गाढवाला चपलांचा हार घालून त्यावर जावयाला बसवून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून ग्रामपंचायत कार्यालयात समारोप करण्यात येतो. गर्दभ स्वारीच्या मानकरी जावयाला भरपेहराव आहेर व अंगठी देऊन सन्मान करण्यात येतो. ही 90 वर्षांपासून गावकरी परंपरा जपत आहेत. धुळवड जवळ आली की, येथील जावायी भूमिगत होतात. परंतु मेव्हणे ही कमी नसून ते शोध घेऊन जावायाला पकडून आणतात. मंगळवारी ( दि. 7 ) धुळवड असल्याने सोमवारी ( दि. 6 ) विडेकर रात्री उशिरापर्यंत जावायाच्या शोधात होते. परंतु जावायी हाती लागले नव्हता. यामुळे यंदाचा गर्दभ स्वारीचा मानकरी जावयी कोण? याची उत्सुकता लागली आहे. ही उत्सुकता आज सकाळीच समजेल. ही पारंपरिक मिरवणूक पार पाडण्यासाठी सुरज पटाईत ( सरपंच ), सदाशिव वाघमारे ( उपसरपंच ), गोविंद देशमुख, महादेव पटाईत, नारायण वाघमारे, जोतिराम घोरपडे, शहाजी घुटे, रावसाहेब पटाईत यांच्या सह सर्व विडेकर परिश्रम घेत आहेत.
मोबाईल बंद करून 200 जावायी भूमिगत
तसं विड्यात घर जावयांची संख्या इतर ठिकाणच्या तुलनेत अधिक आहे. अनेक जावायी कामधंदा निमित्ताने सासरवाडीत म्हणजे विड्यात रहातात. परंतु धुळवड जवळ आली की, हे सर्व जावायी मोबाईल बंद करून भूमिगत होतात. यावर्षी गावातील व बाहेर गावी रहाणारे जवळपास 200 जावायी काही कारणं सांगून मोबाईल बंद करून भूमिगत झाले असल्याचे सांगितले जात आहे.
90 वर्षाची परंपरा
जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची 90 वर्षांची परंपरा असून, निजाम काळात सर्व प्रथम येथील ठाकुर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला मेव्हण्यांनी थट्टा मस्करीत गाढवावर बसवून मिरवणूक काढली होती. तेव्हा पासून ही गावाची परंपरा झाल्याचं ग्रामस्थ सांगतात.