जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
खबरदारीचा उपाय म्हणून बससेवा बंद

लोकगर्जनान्यूज
बीड : जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला काल गालबोट लागले असून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दिसून आले. या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून बीड जिल्ह्यात बससेवा बंद ठेवण्यात आली.
अंतरवली सराटी ( ता. अंबड जि. जालना ) येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले. यास समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळाला. परंतु शुक्रवारी ( दि. १ ) या आंदोलनाला गालबोट लागले असून पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. पहाता पहाता हा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरात पोचला. याचे पडसाद उमटायला सुरू झाले. शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी बससेस वर दगडफेक व जाळ्याच्या बातम्या आहेत. या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ समाजाने बीड जिल्हा बंदची हाक दिली. या हकेला ओ देत अख्खा जिल्हा या बंदमध्ये सहभागी झाला. जिल्ह्यातील सर्वच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला परंतु ग्रामीण भागातही बंद यशस्वी झाला असून गावागावात बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी सकाळपासून मराठा समाज रस्त्यावर उतरलेला दिसून येत आहे.