जनतेचा विश्वासाला तडा; बीड जिल्ह्यात मल्टीस्टेटचा बाजार उठणार!
आज साईराम मल्टीस्टेटला कुलुप असल्याने ठेवीदारांची धाकधूक
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेट कडून खातेदार व ठेवीदारांना वेळेवर रक्कम मिळत नसल्याने तर काही संस्थांना कायम टाळे लागल्याने जनतेचा विश्वास गमावला आहे. आज आणखी साईराम मल्टीस्टेटच्या बाबतीत हाच प्रकार समोर आल्याने बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेटचा बाजार उठणार असे चित्र दिसून येत आहे.
आयुष्यभर रक्ताचा घाम करुन पै–पै जोडायची व काही कामाला पैसा येईल म्हणून चार-दोन टक्के व्याजदर अधिक मिळत असल्याने अनेकांनी मल्टीस्टेट सोसायट्या मध्ये ठेवी ठेवल्या आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून या मल्टीस्टेट बंद पडत असून शेकडो खातेदारांचे लाखो रुपये अडकून पडले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी जिजाऊ माँ साहेब अशीच बंद पडली यानंतर ज्ञानराधाचा नंबर लागला आज साईराम ही तब्बल २० शाखा असलेली मल्टीस्टेट सोसायटी बंद असून पैसे काढण्यासाठी ठेवीदारांनी शाखे समोर गर्दी केली. पण त्यांना हक्काची रक्कम मिळत नाही. आपला घामाचा पैसा मिळणार की, नाही? या चिंतेत ठेवीदार असताना मात्र या चालकांकडून व्हिडिओच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पैसा सुरक्षित असल्याचे दावे करतात. पण पैसा सुरक्षित आहे तर वाटप का करत नाही? असा प्रश्न ठेवीदार विचारत आहेत. आतापर्यंत अनेक मल्टीस्टेटनी लोकांचे पैसे अडकवून गाशा गुंडाळला असल्याने आता लोकांचा या संस्थावरच विश्वास उडाला आहे. त्यामुळे पावला-पावलावर असलेली मल्टीस्टेटच्या सापळ्यांचा बाजार उठणार असल्याचे दिसून येत आहे.