भवताली

जगातील पहिल्या लोकशाहीचे जनक : महात्मा बसवेश्वर

आज अक्षय तृतीया जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती. महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी झाला. वडील मणिराज व आई मादंबा यांच्या पोटी हे सुपुत्र जन्माला आले. तो दिवस हा अक्षयतृतीया होता. आज पासून ९१७ वर्षापुर्वीचा तो दिवस आहे. बाराव्या शतकात या भारत भूमीवर एक महात्मा जन्माला आला आणि जगातील सर्वप्रथम लोकशाही संसदेची म्हणजे अनुभव मंडपची स्थापना केली. ते समग्र क्रांतीचे आद्य समाज सुधारक म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. माणसाला माणूस म्हणून जगण्याची, स्वांतत्र्य, समता व न्याय मिळून देणारे, दाबून टाकलेल्या माणसाला पुन्हा उभे करून त्यांना प्रतिष्ठा देणारे, प्रश्न यज्ञ करून सुटत नाही तर विचारातून सुटतात असे स्पष्ट सांगणारे, प्रश्न देवाला बळी देऊन सुटत नाही तर प्राणी व मानव यांच्या सुसंवादातून सुटतात, स्त्री व पुरुष हे समान आहेत. अन् सत्तेचा वापर मस्तीसाठी नाही तर मानवी कल्याणासाठी करायचा असतो. असे स्पष्ट  सांगणारे विज्ञानवादी पहिले समाज सुधारक म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर होत.
कृष्णा व मलप्रभा या नदीच्या संगमावर कुंडमसंगम या ठिकाणच्या अध्ययन केंद्रात त्यांनी बारा वर्ष विविध जाती, धर्म, भाषा तसेच ग्रंथाचा, शास्त्रांचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. कुंडलसंगम हे महान अशा निसर्गाचे, एकेश्वरवादाचे बसवंण्णा यांच्या ज्ञानप्राप्तीचे प्रतीक आहे. त्यांनी निर्गुण, निराकार आणि एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. कारण जगात सर्वात शक्तिशाली हा निसर्ग आहे. निसर्ग आणि मानव यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध असून त्यातून नवनिर्मिती उदयाला येत असते. निसर्ग देवो भव: ही भारतीय संस्कृती आहे. याला त्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर उतरले आहे.
काय कवे कैलास म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारे पहिले महापुरूष म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. ज्यांना मुक्ती पाहिजे त्यांनी श्रम केले पाहिजे. श्रमाला मुक्तीची जोड महात्मा बसवेश्वर यांनी दिली आहे. बसवंण्णा यांना सगळयात प्रिय काय होते, तर ते म्हणजे श्रम, काम किंवा कार्य. कष्ट करतो तो कधीच परावलंबी होत नाही आणि तो कधीच भीक मागत नाही. तत्कालीन परिस्थितीमध्ये कामाची विभागणीनुसार  माणसांची व समाजाची विभागणी झाली होती. माणुस जाती-पाती, धर्म पंथ, भाषा, वेशभूषा अशा प्रकारे विभागला‌ गेला होता. पण त्यातून समाजाला उभा करण्याचे, जनसामान्यांना वाईट प्रथेपासून मुक्ती देणारे, मुक्तिदाता म्हणजे महान विभूती संत महात्मा बसवेश्वर होत. मानव कल्याणकारी समाजाची निर्मिती महात्मा बसवेश्वरांनी केलेली आहे.
जगतज्यो्ती महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. हा धर्म श्रम आणि कष्टाच्या मूल्यावर आधारित आहे. बसव वचन म्हणजे लिंगायत धर्माचा धर्मग्रथ आहे. श्रम सिद्धांत हा त्यांच्या चळवळीचा, लिंगायत धर्माचा मूलभूत गाभा आहे. मानव कल्याणासाठी क्रांतिकारक निर्णय घेणारे, क्रांतिपर्व तयार करणारे पहिल संत म्हणजे जगतज्योती महात्मा बसवेश्वर होत. महात्मा बसवेश्वर यांचे विचार अलीकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या प्रबोधनातून सांगितला. तो म्हणजे ही पृथ्वी शेषनागाच्या मस्ताकावर उभी नसून ती इथल्या कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर उभी आहे. हेच महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितले आहे. अस्वस्थ आणि गोंधळलेल्या माणसाला राजमार्ग दाखविण्याचे काम सगळ्यात मोठ्या प्रमाणात कोणी केले असेल तर ते म्हणजे महात्मा बसवेश्वर यांनी केले आहे. अंधश्रद्धे विरुद्ध, वाईट रूढी आणि परंपरा विरुद्ध देशातील सगळ्यात मोठे बंड म्हणजे क्रांतिकारक महात्मा बसवेश्वर यांचे लिंगायत चळवळीचे बंड आहे. काळाच्या  पुढे जाऊन, जगाच्या पुढे जाऊन महात्मा बसवेश्वरांनी बसव वचनांच्या माध्यमातून मानवी कल्याणाचे जग निर्माण केले आहे. लिंगायत चळवळीत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कारण वेदना, दुःख आणि त्रास महिलां वर्गला मोठ्या प्रमाणात त्या परिस्थितीमध्ये होत होता.
महात्मा बसवेश्वरांनी तत्कालीन व्यवस्थेला प्रश्न विचारले? त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली नाहीत. म्हणून मानव कल्याणासाठी त्यांनी चळवळ उभी केली आहे. लहानपणीच त्यांनी पुरुष व महिला विषमतेवर पहिले बंड उभे केले. त्यामुळे पुरुष प्रधान परंपरेला तो मोठा हादरा बसला होता. महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना, महिलांना ही स्वातंत्र्य दिले. त्यांचे हक्क त्यांना मिळवून दिले. हातात असलेल्या सत्तेचा वापर कसा करायचा असतो, कशासाठी करायचा असतो आणि सत्तेचा वापर करून समाज कसा बदलायचा असतो यांचा आदर्श जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी आपल्याला बाराव्या शतकात घालून दिलेला आहे. म्हणून ते बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते व सर्व प्रथम लोकशाही मूल्यांची सुरुवात करणारे महात्मा ठरतात. माणूस जातीत विभागला जाणार नाही, तर माणूस माणसात यावा यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्टा केली. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याची एक पद्धत आहे. तेच महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या लिंगायत धर्मामध्ये बसव वचनाच्या माध्यमातून सांगितले आहे. महात्मा बसवेश्वरांनी खालील अत्यंत महत्त्वाच्या चार संकल्पना सांगितल्या आहेत. एक म्हणजे शरण, शरण म्हणजे बसवंण्णाची विचारधारा अंगीकारणारा, बसव वचनाप्रमाणे आचरण करणारा, वचनाचे पालन करणारा याला शरण म्हणतात. दुसरी म्हणजे जंगम, जंगम म्हणजे लिंगायत धर्माचा प्रसार व प्रचार करणारे व्यक्ती होत. तिसरी म्हणजे दासहो, दासहो म्हणजे आपल्या संपत्तीतील समाजासाठी, समाजातील गरजवंतासाठी दान करणे होय. तर चौथी म्हणजे कायक. कायक म्हणजे काम, कष्ट, श्रम, व्यवसाय करणे होय.
सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राजाच्या दरबारात पंतप्रधान म्हणून त्यांनी एकतीस वर्ष कार्य केले आहे. येथेच अनुभव मंडळाच्या माध्यमातून लोकशाहीची सुरुवात केली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना अनुभव मंडपात प्रवेश देणारे महात्मा बसवेश्वर होत. या अनुभव मंडपात ७७० सदस्य होते. एवढी मोठी ही संसद होती. यात महिलांची संख्याही ७० ऐवढया मोठ्या प्रमाणात होती. म्हणून बसवण्णा हे जगातील पहिल्या लोकशाही संसदेचे निर्माते ठरतात. अनुभव मंडप म्हणजे आताची आपली भारतीय संसद.  ते त्यांनी बाराव्या शतकात तयार केली होती. सर्व जाती, धर्म, पंथ व भाषा अशा विविध समाजाच्या लोकांना त्यामध्ये प्रतिनिधित्व दिले होते.
महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यात समता, मूल्य, न्याय, बंधुता, एकात्मता, स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण व शिस्त, सुशासन व प्रशासन या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले आहे. जे आजच्या काळातही तेवढेच मूल्यवान आहे. याच बसवांण्णाच्या वचनाचा अवलंब केल्यास आज देशात निर्माण होणारी विषमता, हिंसा भेदभाव व जातीय राजकारण इ. समस्येवर सहज मात करता येईल. बसव वचन पहा – देव म्हणजे शरीर, हा देहच माणसाचे मंदिर आहे. पाय म्हणजे पाया आहे. वरील भागा मंदिराच्या भींती आहेत आणि डोके म्हणजे मंदिराचा सुवर्ण कळस आहे. असे महात्मा बसवेश्वरांनी मानवी देहालाच मंदिर, देव मानले आहे. आत्मरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी बद्दल महात्मा बसवेश्वर काय म्हणतात, नको करू चोरी, नको करू हत्या | नको करु राग, नको करु द्वेष | नको मारु फुशारकी, नको करू निंदा |हीच आत्मरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी |हे कुंडलसंगम देवा. माणसाने जीवन जगत असताना कसे वागावे, काय करावे त्याबद्दल महात्मा बसवेश्वर म्हणतात, देवलोक मूत्युलोक हे नव्हेत वेगळे हो ! सत्य बोलले जाते तेच देवलोक | मिथ्या बोलले जाते तेच मृत्युलोक | सदाचार हिची स्वर्ग, अनाचार हिची नरक | कुंडलसंगम देवा, तुम्हीच याला साक्ष. बसव वचनाच्या माध्यमातुन बसवेश्वरांनी झोपलेल्या माणसांना जागे केले ‍आणि क्रांतीकारी परीविर्तन घडवून आणले.
महात्मा बसवेश्वरांच्या वचनात समता, मूल्य, न्याय, बंधुता, एकात्मता, स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण व शिस्त, सुशासन व प्रशासन यावरील विचार आजही देशात निर्माण होणारी विषमता, हिंसा, भेदभाव व जातीय राजकारण इ. समस्येवर सहज मात करणारी आहे. कारण  बसव वचन प्रयेक माणसाला सामर्थ्यवान बनवतात. म्हणून सत्तेचा वापर मानव कल्याणासाठी करणारे, आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते व अनुभव मंडपाच्या माध्यमातुन जगातील पहिल्या लोकशाहीचे जनक संत महात्मा बसवेश्वर आहेत.
महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज सर्व जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली  जात आहे. ते त्यांनी दिलेल्या अमूल्य अशा तत्त्वज्ञानमुळेच. जगतज्योती महात्मा बसवेश्वर आजही जिवंत आहेत. कारण त्यांचे तत्त्वज्ञान आजही समस्त जगासाठी दीपस्तंभ आहे. त्यांचा नुकताच नांदेड शहरामध्ये बसवलेला भव्य पुतळा त्यांच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. तो समस्त जनांना सदैव मार्गदर्शनाचे काम करीत राहील. अशा या महान विभूती, समता नायक, कृतिशील सुधारक, महापुरुष, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन. जय बसवेश्वर…!

——————————————

महात्मा बसवेश्वरांच्या वचनात समता, मूल्य, न्याय, बंधुता, एकात्मता, स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण व शिस्त, सुशासन व प्रशासन यावरील विचार आजही देशात निर्माण होणारी विषमता, हिंसा, भेदभाव व जातीय राजकारण इ. समस्येवर सहज मात करणारी आहे. कारण  बसव वचन प्रयेक माणसाला सामर्थ्यवान बनवतात. म्हणून सत्तेचा वापर मानव कल्याणासाठी करणारे, आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते व अनुभव मंडपाच्या माध्यमातुन जगातील पहिल्या लोकशाहीचे जनक संत महात्मा बसवेश्वर आहेत.

डॉ. नागेश कराळे
(९६३७४१३९१३)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »